सातारा : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर यांच्यावतीने सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे १६ नोव्हेंबरला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ यांची निवड झाली आहे. साहित्य सभेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू यांनी ही घोषणा केली.दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. विजय चोरमारे यांनी सातारा येथील 'मैत्री' निवासस्थानी भेट देऊन किशोर बेडकिहाळ यांचे कौतुक केले. याप्रसंगी माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक कवी प्रमोद मनोहर कोपर्डे व सामाजिक कार्यकर्ते दिनकर झिंब्रे, अजिंक्य चोरमारे उपस्थित होते.किशोर बेडकिहाळ यांनी गेल्या वर्षी फलटण येथे पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यांचे पंडित नेहरू आणि सेक्युलॅरिझम, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक मागोवा हे ग्रंथ प्रकाशित आहेत. बदलता महाराष्ट्र, भारतीय राजकीय व्यवस्था : प्रक्रिया आणि स्वरूप, विचारवेध संमेलन अध्यक्षीय भाषणाचे खंड, शतकांतराच्या वळणावर (विचारवेध संमेलनातील निवडक निबंध संग्रह), परिवर्तन विचार चिंतन आणि चिकित्सा, सारीपाट आणि गुलाल, चौकटीबाहेरचे चिंतन, वेध नेहरू विचार विश्वाचा आदी ग्रंथांचे संपादन त्यांनी केले आहे. गांधींविषयी त्रिखंडातील साधना प्रकाशनच्या वतीने प्रकाशित ‘गांधी: जीवन आणि कार्य’ हा खंड १ चे संपादन त्यांनी केले आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी किशोर बेडकिहाळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 12:58 PM