तांबवे : धाडस, आत्मविश्वास असेल तर तुम्ही केव्हाही भरारी मारु शकता. कधीही स्वत:वरील विश्वास ढळू द्यायचा नसतो. सध्या नकारात्मक भावना वाढली आहे. सकारात्मक विचारात राहिलात तरच आत्मविश्वास निर्माण होईल. आपल्यातील क्षमता, ताकद, सामर्थ्य जाणले पाहिजे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते, प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी केले.
तांबवे (ता. कऱ्हाड) येथे आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुशीला ज्ञानदेव पाटील बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष नयना खबाले-पाटील, श्रीमान पाटील, सरपंच शोभाताई शिंदे, विकास पाटील, विशाल पाटील उपस्थित होते.
प्रा. नितीन बानगुडे-पाटील म्हणाले, अडचणी तुम्हाला थांबविण्यासाठी नाहीत, तर तुमची उंची वाढविण्यासाठी येतात. संकटे रोखण्यासाठी नाहीत, तर क्षमता वाढविण्यासाठी येतात. अडथळे अडचणी निर्माण करण्यासाठी नव्हे तर तुमच्यात कौशल्य निर्माण करण्यासाठी येतात. धोका नको म्हणून जे काहीच करत नाहीत, ते काहीच बनत नाहीत. जे काहीतरी करतात तेच काहीतरी बनतात. संधी शोधावीच लागते, ती निर्माण करावी लागते. व्यापक विचार ठेवा, यशही व्यापक मिळेल. या सृष्टीत तुमचा पराभव दुसरा कोणीच करु शकत नाही. तुमचा पराभव तुम्हीच करु शकता. तुम्हाला कोणीच विजयी करु शकत नाही, केवळ तुम्हीच तुम्हाला विजयी करु शकता.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, माजी उपसरपंच धनंजय ऊर्फ रवी ताटे, सुधीर नलवडे, शंभूराज पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. नयना खबाले यांनी प्रास्ताविक केले. राहुल साठे यांनी सूत्रसंचालन केले तर उपसरपंच ॲड. विजयसिंह पाटील यांनी आभार मानले.
फोटो : २४ केआरडी ०२
कॅप्शन : तांबवे (ता. कऱ्हाड) येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे उपनेते, प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांच्या हस्ते झाले.