सातारा : लोधवडे (ता. माण) येथील प्राथमिक शाळेतील धडपडीचे, तंत्रस्नेही, उपक्रमशील शिक्षक सतेशकुमार माळवे यांच्या उपक्रमाला विविध नवोपक्रम स्पर्धेत यश मिळाले. सातारा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पहिल्या सातमध्ये त्यांच्या नवोपक्रमाची निवड झाली.
कोरोना महामारी संकटातही आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सतेशकुमार माळवे यांची सतत धडपड सुरू आहे. त्यासाठी ते मार्च २०२० पासून विद्यार्थ्यांकरिता नवनवीन असे काही ऑनलाईन व ऑफलाईन शैक्षणिक उपक्रम राबवित आहेत. शासनस्तरावरील विविध शैक्षणिक उपक्रम तर ते प्रभावीपणे राबवित आहेतच. याशिवाय ते त्यांच्या कल्पक व सर्जनशील कृतीने शिक्षण आनंददायी बनविण्यासाठी सततचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळेच कोरोना संकटकाळातही त्यांचे विद्यार्थी शिक्षण प्रवाहात चांगल्यापैकी टिकून शिक्षण घेत आहेत.
सतेशकुमार माळवे यांच्या ‘माझे बक्षीस’ या नवोपक्रमाची शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या नवोपक्रमाच्या स्पर्धेत तसेच सातारा जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पहिल्या सात नवोपक्रमात निवड झाली आहे.
आपले विद्यार्थी जास्तीत जास्त मनोरंजक व आनंददायी पद्धतीने कृतिशील बनविण्याचे त्यांचे सातत्यपूर्ण निकराचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. कोरोना संकटकाळात त्यांनी आजवर आपल्या विद्यार्थ्यांसाठी जवळपास नऊशेच्या आसपास ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उच्चांकी अशा तासिका घेण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थी ज्ञानसंपन्न बनविण्यासाठी त्यांनी या कोरोनाकाळातही कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करीत अनेक यशस्वी स्वरूपाचे शैक्षणिक प्रयोग व उपक्रम राबविले. आतापर्यंत त्यांनी कोरोनाकाळात अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहेत.
‘घरोघरी ज्ञान गंगोत्री’ हा असाच एक अभिनव शैक्षणिक उपक्रम ते सध्याला राबवित आहेत. यामध्ये माळवे हे विद्यार्थ्यांना नियोजनपूर्वक गृहभेटी देत आहेत. त्यांच्याशी शैक्षणिक संवाद साधत आहेत. या भेटीदरम्यान ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व अध्यापन करीत आहेत. अशाप्रकारे ‘घरोघरी ज्ञान गंगोत्री’ पोहोचविण्याचा ते तळमळीने, प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. ते राबवित असलेल्या अनेक विविध उपक्रमांचे सर्वच स्तरांतून चांगल्या प्रकारे कौतुक होत आहे.
माण तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सोनाली विभूते, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख नारायण आवळे, मुख्याध्यापक दीपक ढोक व सहकारी शिक्षक दीपक कदम, संतराम पवार, सुचिता माळवे, दीपाली फरांदे तसेच बहुसंख्य शिक्षणप्रेमी मंडळी, पालक आणि ग्रामस्थांकडून माळवे यांच्या ‘घरोघरी ज्ञान गंगोत्री’या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
_____________