सातारा : माणूस गेल्यानंतर त्याचे श्राद्ध घालण्याची परंपरा आपल्या समाजात रुढ आहे. घरातला जीवलग अचानकपणे निघून गेल्यानंतर कुणालाही दु:ख होते. मग तो घरातला पाळीव प्राणी का असेना!
सातारा शहराजवळच्या कोडोली गावात राहणाऱ्या काटे-देशमुखांनाही सांभाळलेला घोडा निघून गेल्याचा चटका लागून राहिला. दि. ४ जुलै रोजी या घोड्याचे चक्क वर्षश्राद्धही त्यांनी घातले.प्राणीमात्रांवर दया करावी, अशी आपली संस्कृती सांगते. आपण तसे करतोही; पण घरातल्या एका पाळीव प्राण्यावर इतके प्रेम करतो का? की जेव्हा त्याचा मृत्यू होऊनही वर्षानुवर्षे त्याचे दु:ख बोचत राहील? हो कोडोलीतल्या काटे-देशमुख कुटुंबानेही आपल्या काळजाचा तुकडा असलेला चेतक नावाचा घोडा गतवर्षी गमावला. हे कुटुंब अजूनही दु:खावेगात आहे.एखाद्या प्राण्याबरोबर जर आपलं नातं तयार झालं तर ते कधीही तुटत नाही, उलट ते अधिक दृढ होतं. भले तो आपल्याला सोडून जाऊ द्या; पण त्याच्याप्रती आपलं प्रेम, माया कधीच कमी होत नाही. याची प्रचिती साताऱ्यात दिसून आली.सातारा येथील कोडोली परिसरातील काटे कुटुंबीयांनी त्यांच्या चेतक नामक घोड्याचे वर्षश्राद्ध घातले आहे. डबल महाराष्ट्र केसरी असणारा चेतक घोडा नाचकामाच्या कलेमुळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. मात्र गेल्यावर्षी चेतकचे निधन झाले. त्यामुळे त्याचे बुधवार, दि. ४ जुलै रोजी वर्षश्राद्ध घालण्यात आले.
चेतकला लग्न शुभकार्यासाठी खूप मागणी होती. अकलूज व पुणे येथे झालेल्याऱ्यां घोड्यांच्या भव्य नाचकाम स्पर्धेमध्ये चेतकहने प्रथम क्रमांक मिळविला होता. सूरज काटे-देशमुख आणि कुटुंबीयांनी चेतकचा घरातील सदस्याप्रमाणे सांंभाळ केला होता आणि त्याचे वर्षश्राद्धसुद्धा अगदी विधिवत केले.
जवळपास दीड ते दोन हजार माणसं चेतकच्या वर्षश्राद्धसाठी आली होती. यानिमित्त काटे-देशमुख कुटुंबीयांनी या सर्वांची जेवणाचीसुद्धा व्यवस्था केली होती. काटे-देशमुख यांच्याकडे राजा आणि पिंट्या अशी अजून दोन घोडी आहेत. यांनाही लग्नकार्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते.अज्या अन् शीतलीच्या लग्नातसुद्धा यांचेच घोडेसध्या प्रसिद्ध असलेली मालिका म्हणजे लागिरं झालं जी. यात मध्यंतरी अज्या अन् शीतलीचं लग्न झालं. यातसुद्धा काटे-देशमुख कुटुंबीयांचा राजा आणि पिंट्या नामक घोडे वरातीसाठी होते. त्यामुळे या दोन्ही घोड्यांनासुद्धा लग्नकार्यात मागणी आहे.विविध ठिकाणांहून अश्वप्रेमी उपस्थितचेतकने सर्वांच्या मनात एक नातं तयार केलं होतं, त्यामुळे त्याच्या वर्षश्राद्धादिवशी अकलूज, सोलापूर, पुणे, बीड आदी जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने अश्वप्रेमी उपस्थित राहिले होते.
आमचा चेतक हा सर्वांच्या मनावर राज्य करणारा होता. जर एखाद्याच्या लग्नाच्या तारखेदिवशी चेतक घोडा उपलब्ध नसेल तर हाच घोडा पाहिजे म्हणून चेतक घोडा कोणत्या तारखेला बुक नाही ते सांगा त्या तारखेला आम्ही लग्न घेऊ, असे म्हणून लग्नाची तारीखही पुढे ढकलतात.-सूरज काटे-देशमुख