लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : शालेय विद्यार्थी आणि अंगणवाडीत जाणारी लहान मुलं यांना पाणी उपलब्ध न झाल्याने आजारांचा धोका असतो. शाळा परिसरात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत असल्याने शाळेच्या उपस्थितीवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे राज्याच्या सर्व ग्रामीण भागातील शाळा आणि अंगणवाडी केंद्रांबाहेर मुबलक पाणी देण्याचे काम सुरू झाले आहे. याअंतर्गत आत्तपर्यंत ५३ लाख ८८ हजार ४२८ ठिकाणी नळजोडणी करून पाण्याची सोय करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याने राज्यात सर्वांत आधी उद्दिष्टपूर्ती करून राज्यात बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ अकोला आणि अहमदनगरचा क्रमांक लागतो.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाने गांधी जयंतीपासून पुढील १०० दिवसांत ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी देऊन पिण्यासाठी, वापरासाठी आणि स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध देण्याचा उपक्रम हाती घेतला होता.
जल जीवन मिशन अभियानात राज्य शासनाचा ५० टक्के सहभाग असून राज्याच्या ग्रामीण भागात घराघरांतील नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविणे हे काम राज्य शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पाण्याबाबत कालबद्ध नियोजन करणे आवश्यक असून नैसर्गिक, कृत्रिम पाणीसाठे याबाबतचा जल आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले होते.
या मोहिमेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना ग्रामीण भागातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्रांमध्ये नळजोडणी करून पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. १०० दिवसांच्या या मोहिमेत राज्यातील प्रत्येक गावच्या स्थितीचे सनियंत्रण राज्यस्तरावरून आणि जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.
कोट :
शरीरात पाण्याची कमतरता हे अनेक आजारांचे मूळ कारण समजले जाते. मुलांसाठी अंगणवाडी आणि शाळांवर लक्ष केंद्रित केले आहे. राज्याने २०२०-२०२१ चे ६८ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यासाठी पेयजलमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले.
- आर. विमला, मिशन संचालक, जल जीवन मिशन, मुंबई
चौकट :
पुणे विभागातून कोल्हापूरने १ लाख २५ हजार १९४, नाशिक विभागातून अहमदनगरने २ लाख ३४ हजार ४७४, अमरावती विभागातून अकोलाने ५४ हजार ५२३, तर नागपूर विभागातून नागपूरने ९६ हजार ८६६ अंगणवाडी आणि शाळांच्या अंगणांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. राज्यात औरंगाबाद आणि कोकण विभागातून अद्याप एकाही जिल्ह्यातून उद्दिष्टपूर्ती झालेली नाही.