कऱ्हाड : शहरात देवगड हापूस विक्रीसाठी दाखल झाला आहे. आवक कमी असल्याने तेराशे ते सोळाशे रुपये डझन, याप्रमाणे आंब्यांची विक्री होत आहे. आवक कमी असल्याने आंब्याचे दर काही दिवस चढेच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.गत महिन्यात २ हजार २०० रुपये डझन याप्रमाणे आंबा विकला गेला. आता तो दर तेराशे ते सोळाशे रुपयापर्यंत खाली आला आहे. कऱ्हाडात देवगड हापूस व पायरी आंब्याचे काही व्यापारी प्रसिद्ध आहेत. संबंधित विक्रेते कोकणातून हापूस व पायरी आंबा विक्रीसाठी आणतात.
पुणे, मुंबईसह परदेशातही त्यांचा आंबा जातो. आंबा खराब झाल्यास तो बदलून दिला जात असल्याने, ग्राहक या ठिकाणाहून आंबा खरेदी करताना दिसतात. देवगड आंबा खारकीप्रमाणे वाळत जातो, पण तो खराब होत नाही, असे संबंधित विक्रेते सांगतात. त्यामुळे ते आंबा खराब निघाल्यास बदलूनही देत आहेत.