कोपर्डे हवेली : सातारा जिल्हा परिषदेच्या पिण्याचे पाणी स्रोत्र स्वच्छता सर्वेक्षणामध्ये कोपर्डे हवेली, बनवडी ग्रामपंचायतीला चंदेरी सन्मानपत्र देऊन जिल्हा परिषदेने गौरव केला.
या कामगिरीबद्दल कऱ्हाड पंचायत समिती आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ. सुनील कोरबू यांनी कोपर्डे हवेलीचे सरपंच नेताजी चव्हाण यांना चंदेरी सन्मानपत्र दिले.
सन २०१६ ते २०२० अखेर सलग पाच वर्षे कोणत्याही प्रकारचा जलजन्य साथीचा आजार होऊ नये, यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी व ग्रामपंचायतीला सलग पाच वर्षे हिरवे कार्ड मिळाल्याने आपली ग्रामपंचायत कौतुकास पात्र आहे. आपली कामगिरी इतर ग्रामपंचायतींना आदर्श ठरेल व आपली सातत्यपूर्ण कामगिरी अशीच राहील, यासाठी ग्रामपंचायतीला चंदेरी सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे, असे सन्मानपत्रात लिहून गौरविण्यात आले आहे.
(चौकट)
नळपाणी पुरवठा योजनेमुळे महत्त्व
कोपर्डे हवेली आणि बनवडी ग्रामपंचायतीची चौकशी बाय सात नळपाणी पुरवठा योजना कृष्णा नदीवर असल्याने चंदेरी सन्मानपत्राला विशेष महत्त्व आहे.