कोरेगाव : चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सने साखर कारखान्यात प्रक्रिया केलेले सांडपाणी ओढा अगर नदीत न सोडण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मंगळवार, दि. २६ जानेवारी रोजी होणारे कोरेगाव आणि कुमठे ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले.
कोरेगाव पोलीस ठाण्यात याविषयी साधकबाधक चर्चा झाली. या चर्चेस आंदोलनकर्त्यांसह कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते. याबाबत नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, सी. आर. बर्गे, हणमंतराव जगदाळे, पृथ्वीराज बर्गे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जरंडेश्वर शुगर मिल्सच्या मळीमिश्रित पाण्यामुळे तीळगंगा नदी पूर्णत: प्रदूषित झाली होती. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले होते. नदीतील जलचरांबरोबरच अनेक जनावरे हे पाणी पिल्याने दगावली होती. सातत्याने प्रशासनाकडे निवेदने देऊनदेखील त्याकडे लक्ष न दिल्याने कोरेगाव, कुमठेसह १३ गावच्या शेतकरी व विविध सामाजिक संघटनांनी दि. २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा दिला होता.
पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या पुढाकाराने सोमवारी दुपारी पोलीस ठाण्यात आंदोलनकर्ते व कारखान्याचे सरव्यवस्थापक विजय जगदाळे यांची बैठक झाली. त्यामध्ये काही तांत्रिक कारणामुळे मळीमिश्रित पाणी ओढ्याद्वारे नदीपात्रात जात असल्याचे कारखान्यातर्फे सांगण्यात आले. कारखान्याने आता आधुनिक यंत्रणा बसवली असून, पाण्यावर पुनर्प्रक्रिया करुन त्याचा वापर केला जात असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी व्यवस्थापनाच्यावतीने लेखी पत्रदेखील पोलीस ठाण्यास दिले. कारखान्याने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर लाक्षणिक उपोषण मागे घेण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी जाहीर केले.