कोरेगाव : तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी शांततेत सुमारे ८१.९२ टक्के मतदान झाले. दुरंगी लढत होत असल्याने प्रत्येक गावात आणि वाडीवस्तीवर मोठी चुरस होती. ६८७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. सोमवारी दि. १८ रोजी सकाळी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला. ५६ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यापैकी नागेवाडी, चिलेवाडी, तडवळे संमत वाघोली, कोलवडी, होलेवाडी, भिवडी व बोधेवाडी (चिमणगाव) या ७ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. १२ ग्रामपंचायतींची अंशत: निवडणूक बिनविरोध झाली होती. ४९ गावांमध्ये ३४४ जागांसाठी ६८७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते.
सकाळी मतदानाचा वेग नव्हता. अकराच्या दरम्यान मतदानाची आकडेवारी वाढत गेली. प्रत्येक वाडीवस्ती आणि गावात दुरंगी लढत होत असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या अधिपत्याखाली प्रशासकीय यंत्रणेने अत्यंत काटेकोरपणे नियोजन केले होते. दिवसभर मतदान प्रक्रियेवर सूक्ष्म लक्ष ठेवण्यात आले होते. सायंंकाळी मतदानाचा आकडा चांगलाच वाढला होता.