साहिल शहा --कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारत पंचायत समितीची सत्ता हस्तगत केली आहे. जिल्हा परिषदेच्या पाच पैकी चार गट ताब्यात घेत काँग्रेसला सरळ सरळ पराभूत केले आहे. भीमराव पाटील यांच्या करिष्म्यामुळे वाठार किरोली गट आणि दोन्ही पंचायत समिती गणामध्ये काँग्रेसला विजय मिळाला आहे. कुमठे गणातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे हणमंत शंकर ऊर्फ राजाभाऊ जगदाळे हे सभापतिपदाचे दावेदार ठरले आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह आमदार शशिकांत शिंदे, आ. दीपक चव्हाण यांचे प्राबल्य असलेल्या कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठी काँग्रेससह भाजप व शिवसेनेने प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती. मात्र, कार्यकर्त्यांच्या ताकदीवर पिंपोडे बुद्रुक गटात पक्षाला सहज विजय मिळवता आला. वाठार स्टेशन गटात परिस्थिती आवाक्याबाहेर जात असताना आ. शशिकांत शिंदे यांनी शेवटच्या क्षणी डावपेच आखत काँग्रेसला धूळ चारली आणि विजयश्री खेचून आणली. सातारारोड गटात भाजपने जोरदार लढत दिली, मात्र कार्यकर्त्यांचे संघटन कौशल्याने राष्ट्रवादीला या गटात तारले आणि तिन्ही जागा पक्षाने आपसूक खेचून आणल्या. ल्हासुर्णे गटातील लढत एकदम लक्षवेधी ठरली. गेली दहा वर्षे आपल्या घरातच गटाची सत्ता असलेल्या किरण बर्गे यांच्या विरोधात राष्ट्रवादीने नवख्या जयवंत भोसले यांना संधी दिली होती. काँग्रेसने या गटात आपली ताकद पणाला लावली होती, आ. जयकुमार गोरे यांनी सभा घेऊन राष्ट्रवादीचा समाचार घेतला होता. मात्र, या गटात आ. शिंदे यांची व्यूहरचना तंतोतंत जुळली आणि पक्षाला चांगल्या मताधिक्याने विजय मिळाला. एकंबे गणामध्ये शिवसेनेने प्रथमच यश संपादीत केले आहे. मालोजी भोसले या नवख्या उमेदवाराने राष्ट्रवादीसह काँग्रेसला सपशेल पराभूत केले आहे. वाठार किरोली गटात पहिल्यापासून काँग्रेसची लाट होती, ती थोपविण्यासाठी राष्ट्रवादी फारच कमी पडली. भीमराव पाटील यांनी तालुक्यात सर्वत्र काँग्रेसचा पराभव होत असताना मात्र विजयश्री खेचून आणत काँग्रेसची प्रतिष्ठा राखली आहे. त्यांनी आपल्यासमवेत वाठार किरोली गण आणि साप गणातून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणले आहे. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी हिम्मत खराडे यांनी या निवडणुकीसाठी जबरदस्त प्लॅनिंग केले होते. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले होते. खराडे यांच्या नेतृत्वाखालील टीमने अत्यंत नीटनेटके नियोजन केल्याने झटपट निकाल जाहीर केले जात होते आणि ते कार्यकर्त्यांना समजत देखील होते. मोठी मतदार संख्या असताना देखील तालुक्याचा निकाल लवकर जाहीर झाला....अगोदरच फटाक्यांची आतषबाजीकोरेगाव तालुक्यातील राजकारण हे अगदी टोकावर गेले आहे. तालुक्याच्या सर्वच विभागात जोरदार लढती झाल्या, त्यामुळे नेमका विजय कोण मिळवणार, हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. पिंपोडे बुद्रुक गटात विजय मिळवणारच म्हणून कार्यकर्ते सर्व तयारीनिशी आले होते, त्यांच्या पाठोपाठ एकंबे गणातील शिवसेनेचे उमेदवार मालोजी भोसले यांचे समर्थक देखील त्याच तयारीने आले होते. मतमोजणीच्या अगोदरच कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली आणि फटाक्यांची आतषबाजी केली. वाठार किरोली गटातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुपारपासूनच काँग्रेसचे झेंडे हातात घेऊन विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली होती, निकाल जाहीर होण्यापूर्वीच या गटातील कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात आनंदोत्सव साजरा केला.
कोरेगाव तालुक्यात अखेर ‘शिंदे सरकार’च जोरात पंचायत समितीत राष्ट्रवादीची सत्ता; काँग्रेसला मात्र अनेक ठिकाणी झटका
By admin | Published: February 23, 2017 11:14 PM