वाठार स्टेशन : दिल्लीकरांच्या जिभेची चव पुरविणारा कोरेगावचा राजमा (वाघा घेवडा) सध्या पडत असलेल्या कडक उन्हामुळे धोक्यात आला आहे.
सातारा जिल्ह्यात हवामान आणि पर्जन्यमानानुसार पीक व्यवस्थापन केले जाते. त्यानुसार कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागात व खटाव तालुक्यातील काही भागांत वाघा घेवडा हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अलीकडच्या काळात या पिकाला हमीभाव निश्चित नसल्याने आणि पावसाच्या लहरीपणामुळे या पिकास वाटाणा व सोयाबीन हे पर्याय पीक ठरले आहे. घेवड्यास अधिक पाऊस आणि कडक ऊन या दोन्ही गोष्टी सहन होत नसल्याने आता हे पीक धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हे पीक आता हातातून जाणार अशीच परिस्थिती सध्या दिसू लागली आहे. अजून चार-पाच दिवसांत जर पाऊस पडला नाही तर मात्र कडक उन्हामुळे घेवडा पीक वाया जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
गेल्या अनेक वर्षांत राजमा (वाघा घेवडा) उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कधी कडक उन्हामुळे, तर कधी अधिक पावसाने घेवडा पीक वाया जात आहे. सध्या या भागातील घेवडा पेरणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, पावसाने गेल्या दहा दिवसांपासून उघडीप दिल्याने पेरणी केलेले हे पीक आता पावसाअभावी वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
एका बाजूने दिल्लीच्या बाजारपेठेत मान असलेला राजमा मात्र अजूनही शासनाच्या पीकविम्यात नसल्याने या पिकाला नुकसान भरपाई मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे. कोरेगाव-खटाव तालुक्यातील घेवडा पीकविम्यात घ्यावा, ही येथील शेतकऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी आहे. याबाबत कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी मागणी घेवडा उत्पादक शेतकरी करीत आहेत.