प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड रुग्णांच्या उपचारांनंतर वापरण्यात आलेले पीपीई कीट, हँडग्लोव्हज आणि मास्क यांची विल्हेवाट लावण्याची योग्य खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, साताऱ्यातील एका खासगी कोविड रुग्णालयाच्या दारात ठेवण्यात आलेल्या जैविक कचऱ्याच्या पिशव्या श्वानांनी इतस्त केल्या. परिणामी पिशव्यांतील पीपीई कीट, ग्लोव्हज आणि मास्कसह अन्नपदार्थही उघड्यावर पडले.
कोविड रुग्णांचं हॉटस्पॉट बनू पाहणाऱ्या साताऱ्यात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोडोली परिसरातील एका खासगी कोविड सेंटरच्या पोर्चमध्येच जैविक कचऱ्याच्या पिशव्या रात्रीपासून काढून ठेवण्यात आल्या होत्या. रस्त्यालगतच या पिशव्या ठेवल्याने परिसरातील भटक्या श्वानांनी कचऱ्याची पिशवी पळवून समोर असलेल्या मैदानात नेली. जैविक कचरा नेण्यासाठी असणाऱ्या या बॅगेत चक्क अन्नपदार्थ असल्याचेही पाहायला मिळाले.
कोविडचा संसर्ग दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालय परिसरात नातेवाइकांची गर्दी राहते. उन्हाच्या तडाख्यात झाडाच्या किंवा भिंतीच्या आधाराला बसलेल्या नातेवाइकांना या पिशवीतील वापरलेल्या वस्तूंमुळेही संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालय प्रशासनाने जैविक कचरा विशिष्ट ठिकाणी बंदिस्त ठेवून तो गाडीत जाणं आणि तो सुरक्षित ठिकाणी असेल याची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
चौकट :
हॅण्ड ग्लोव्हजने बांधलंय पिशव्यांचे तोंड
कोविड रुग्णांना तपासणारे डॉक्टर, त्यांना सेवा देणाऱ्या नर्स, यांच्यासह रुग्णांसाठी उपयोग केलेल्या अनेक गोष्टी या कचऱ्याच्या पिशवीत भरल्या होत्या. ‘बायो-मेडिकल वेस्ट कलेक्शन बॅग’ असं लिहिलेल्या या नारंगी रंगाच्या पिशव्या रुग्णालयाच्या प्रवेशद्वारालगतच ठेवल्या आहेत. या पिशव्यांचे तोंड बांधण्यासाठी चक्क वापरलेल्या हॅण्डग्लोव्हजचा उपयोग करण्यात आला आहे. या जैविक कचऱ्याच्या पिशवीत अन्नपदार्थही असल्याने परिसरातील भटक्या श्वानांनी ही पिशवी फाडून त्यातील साहित्य रुग्णालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत पसरले. हे चित्र पाहिल्यानंतर तेथे उपस्थित असणाऱ्या काही तरुणांनी याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडेही विचारणा केली. मात्र, रोज रात्री आम्ही हा कचरा असाच बाहेर आणून ठेवतो असं उत्तर देण्यात आलं.
कोट :
जैविक कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या संस्थेची गाडी उशिरा आल्याने हा कचरा असाच उघड्यावर राहिला. याबाबत कडक शब्दांत समज देऊन संबंधितांना भविष्यात काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
- व्यवस्थापक, मंगलमूर्ती हॉस्पिटल, सातारा.