सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरु असून मंगळवारी सकाळपर्यंत कोयनेला ११६, नवजा १४२ आणि महाबळेश्वरला १२२ मिलीमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रात पाऊस असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे यंदा दुसºयांदा उघडून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
जिल्ह्याच्या पूर्व आणि पश्चिम भागातही पाऊस सुरु आहे. त्यातच दोन दिवसांत पावसाचा जोर वाढलाय. पश्चिम भागातील कोयना, नवजा, कास, बामणोली, तापोळा आणि महाबळेश्वर परिसरात दमदार पाऊस पडू लागला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस नवजा येथे १४२ मिलीमीटर झाला. तर कोयना धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्याने धरणातील पाणीपातळीत वाढ झाली आहे.
मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात १०१.५७ टीएमसी पाणीसाठा झाला होता. तर धरणात येणाºया पाण्याची आवक साडे आठ हजार क्यूसेकवर गेली होती. त्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी दुपारच्या सुमारास सहा दरवाजे दीड फुटाने उचलण्यात आले. त्यातून १२८९१ कुसेक तर पायथा वीजगृहातील १०५० असा एकूण १३९४१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.