पाटण : पाटण तालुक्याला शनिवारपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. कोयनासह मोरणा, केरा, तारळी, काफना, काजळी नद्यांना पूर आला आहे. नेरळे गावाजवळ पाणी शिरल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. वाडीकोतावडेजवळचा पूलही पाण्याखाली गेला आहे. कोयना नदीला पूर आला असून, संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्यात चोवीस तासांत पाच टीएमसीने वाढ झाली आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरणात सध्या ३०.२७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. चोवीस तासांत कोयना येथे १३५, नवजा येथे १४६, तर महाबळेश्वरमध्ये ६७ मिलिमीटर पाऊस पडला. सततच्या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल क्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे डोंगरावर व दुर्गम भागातील गावांचा रविवारी संपर्क तुटला होता. कऱ्हाड-चिपळूण रस्त्यावरही वाहतूक विस्कळीत झाली. तालुक्यातील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. (प्रतिनिधी) सातारा, कऱ्हाड संततधार साताऱ्यासह कऱ्हाड, महाबळेश्वर येथे शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. महाबळेश्वरच्या रस्त्यावर पाणी साठले असून, अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. रस्त्यावर पाणी साठल्याने अनेक पर्यटकांच्या गाड्या बंद पडल्या होत्या. त्यामुळे वाहने ढकलण्याची वेळ आली. महाबळेश्वर, कऱ्हाड, सातारा येथे झाडे पडली आहेत. अनेक गावांत पाणी... ४पांढरेपाणी, मळे-कोळणे, पांथरपुज, नाव गोवारे, पाचगणी, आटोली, निवी, कसणी, बाहे, घाणबी, वाटोळे, गावडेवाडी, काठी-अवसरी, कारवट, रामेल, पळासरी, मराठवाडी, चाफ्याचा खडक, घाटमाथा, नाणेल, आदी गावांतील लोकांना रविवारी मुसळधार पावसामुळे घरातून बाहेर पडता आले नाही. ४गोकुळ तर्फ पाटण, आंबेघर तर्फ मरळी, काहीर या गावांकडे जाणाऱ्या मार्गावरील मोरणा नदीवर असलेला पूल वारंवार पाण्याखाली गेल्यामुळे संपर्क तुटत होता. मध्यम प्रकल्प भरू लागले तालुक्यातील मोरणा-गुरेघर, तारळी, वांग-मराठवाडी, उत्तरमांड, आदी मध्यम प्रकल्प मुसळधार पावसामुळे भरायला लागली आहेत. हे प्रकल्प लवकरच भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात उत्तराचा ‘सुख’वर्षाव! मुंबई : जून महिन्यात दडी मारून बसलेल्या पावसाने रविवारी उत्तरा नक्षत्राचा मुहूूर्त साधत राज्यावर ‘सुख’ वर्षाव केला. नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला असून, मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दोन दिवसांपासून जलधारा बरसत आहेत. पुणे जिल्ह्यात संततधार, खान्देशात भिज पाऊस सुरू आहे. तीन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे विदर्भातील नद्यांना पूर आले असून, गोसेखुर्दचे ३३ दरवाजे उघडावे लागले. नाशिकमध्ये तर गोदावरी दोन वर्षांनंतर प्रथमच दुथडी भरून वाहू लागल्याने मराठवाड्यातील जनता सुखावली आहे. (सविस्तार पान ७ वर) कोल्हापुरात पंचगंगा नदी पात्राबाहेर कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे रविवारी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले. दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हे पाणी पाहण्यासाठी सायंकाळी आबालवृद्धांची उत्सुकतेपोटी एकच गर्दी झाली. जिल्ह्यात सर्वत्र सुरू असलेल्या पावसाने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने राजाराम बंधाऱ्याची पातळी ३२ फुटांपर्यंत गेली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये सर्वाधिक गगनबाबडा तालुक्यात १८९.५० मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, शहरातील ८ नं. शाळेच्या परिसरात झाड उन्मळून झालेल्या दुर्घटनेत एकजण जखमी झाला आहे. (सविस्तार पान ५ वर)
‘कोयने’त पाच टीएमसीने वाढ
By admin | Published: July 11, 2016 1:05 AM