सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर असल्याने सुमारे १०५ टीएमसी पाणीसाठवण क्षमता असणाऱ्या कोयना धरणात १०४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. तर धरणात आवक वाढल्याने सहा दरवाजे साडेपाच फुटांनी उघडण्यात आले असून, त्यातून ४९०७४ व पायथा वीजगृहातून २१०० असे ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात सतत पाऊस होत आहे. या पावसाचा जोर कमी-जास्त होत असलातरी गतवर्षीपेक्षा यंदा धरणे लवकर भरली आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून अनेक धरणांतून पाणी सोडण्यात येत आहे. कोयनेतून तर सतत पाणी सोडण्यात येत आहे.
कोयना धरणात सोमवारी सकाळी १०४.१८ टीएमसी साठा झाला होता. तर २४ तासांत १०० मिलीमीटर पाऊस झाला. धरणात ३६१९९ क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सहा दरवाजे साडेपाच फुटांपर्यंत वरती उचलण्यात आले आहेत. या दरवाजातून आणि पायथा वीजगृहातून ५११७४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी वाढ झाली आहे.जिल्ह्यातील धोम धरणात १२.८० टीएमसी साठा असून, ३७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी धरणातही ९.८३ टीएमसी साठा असून, २२०२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. तारळी धरातून १६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच कण्हेर, बलकवडी या धरणांतूनही पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलीमीटरमध्येधोम १३ /६०७कोयना १०० /५०८५बलकवडी ३७ /२५८०कण्हेर १०/७०३उरमोडी ४०/ ११९९तारळी ४१/ २१३२