सातारा : जिल्ह्यात मागील १५ दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोयना ४७, नवजा ९४ आणि महाबळेश्वरला ६६ मिली मीटरची नोंद झाली. तर जूनपासून नवजा व महाबळेश्वरच्या पावसाने अडीच हजार मिली मीटरचा टप्पा पार केला. त्याचबरोबर कोयना धरणातीलपाणीसाठा ५८ टीएमसी जवळ पोहोचला आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सून उशिरा दाखल झाला. त्याचबरोबर जून महिन्याच्या उत्तर्राधापर्यंत पावसाची उघडझाप सुरू होती. परिणामी खरीप हंगामातील पेरणी होणार का,धरणसाठा वाढणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. पण जुलै महिना उजाडताच जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने धो-धो बरसण्यास सुरुवात केली. सलग पंधरा दिवस कास,नवजा, बामणोली, कोयना, महाबळेश्वर, तापोळा, प्रतापगड या भागात धुवाधार पाऊस पडत होता. त्यामुळे लोकांना सूर्यदर्शन झाले नाही. गेल्या बारा दिवसात तर सतत पाऊस १०० मिली मीटरच्यावर झाला. यामुळे ओढे, नाले खळखळून वाहत आहेत.भात खाचरात पाणी साठले. रस्त्यावर दरड कोसळून वाहतुकीवर परिणाम झाला. पावसामुळे पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी भात लावणीस वेगाने सुरुवात झाली आहे. तर पश्चिम भागातील कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या प्रमुख धरणात पाणीसाठा वाढला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी अनेक धरणांतून विसर्ग सुरू आहे.दरम्यान, एक जूनपासूनचा विचार करता कोयनानगर येथे २०७९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजाला २५३६ आणि महाबळेश्वर येथे २६८३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी दमदार झाल्याने पश्चिम भागात दाणादाण उडाली आहे. तर सध्या पावसाचा जोर ओसरला असल्याने धरणात आवक कमी झाली आहे. सोमवारी सकाळी कोयना धरणात २७ हजार क्युसेस वेगाने पाणी येत होते. तर धरणातील साठा ५७.८६ टीएमसी झालेला. धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.
पूर्व भागात प्रतीक्षा कायम...जिल्ह्याच्या पूर्व भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केली असलीतरी पिके येण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. नाहीतर पिके वाळू शकतात. यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच छोट्या प्रकल्पातील पाणीसाठा ही कमी झाला आहे. बंधारे कोरडे पडले आहेत.
आता कण्हेर मधूनही विसर्ग...जिल्ह्यातील कोयना, उरमोडी तसेच पुणे जिल्हा हद्दीवरील वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यानंतर आता सातारा तालुक्यातील कण्हेर धरणातूनही विसर्ग करण्याचे नियोजन आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चारही वक्र दरवाजातून पाणी सोडण्यात येणार आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.