संजय पाटील
कऱ्हाड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाणारे कोयना धरण महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची तहान भागवते. पावसाळा सुरू होताच तिन्ही राज्यांचे लक्ष या धरणाच्या पाणीसाठ्याकडे असते. सध्याही तीच परिस्थिती असून धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता आहे. मात्र, उभारणीपासून आजअखेर तब्बल पन्नासवेळा धरण ‘बाहुबली’ ठरले असून ते काठोकाठ भरले आहे.
कोयना धरणाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या साठावे वर्ष सुरू आहे. उभारणीपासून या धरणाने तब्बल ५९ पावसाळे पाहिले आहेत. त्यापैकी पन्नास पावसाळ्यांमध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरले, तर नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा धरणातील पाणीसाठा कमी राहिला. मात्र, तरीही उपलब्ध पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लावण्यात व्यवस्थापन यशस्वी ठरले. आजवर या धरणाने राज्य प्रकाशमान करण्याबरोबरच आसपासच्या राज्यांची तहान भागविली आहे. अतिवृष्टीच्या काळात तुडुंब जलाशय आपल्यात सामावून घेतला आहे. तसेच भूकंपाचे हजारो धक्के सहन करीत हे धरण भक्कमपणे उभे आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरेल का, याची चिंता लागून राहते. धरण भरले नाही तर सिंचनासह वीज आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धरण भरावे, यासाठी व्यवस्थापनाला अचूक नियोजन करावे लागते. पावसाचा अंदाज घेत विसर्ग आणि साठा यावर नियंत्रण ठेवावे लागते. सध्याही पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, पायथा वीज गृहाव्यतिरिक्त विसर्ग पूर्णपणे बंद आहे.
- चौकट
... यावर्षी पाणीसाठा कमी
१९६८ : ९४.०२०
१९७२ : ८९.५९७
१९८७ : ९१.२३६
१९८९ : ९८.९८३
१९९५ : ९५.७८९
२००० : ९२.३४६
२००१ : ९१.१२४
२००३ : ९३.२७१
२०१५ : ९४.३५०
- चौकट
पाणीसाठ्याचे नियोजन
६७.५० टीएमसी : वीज निर्मितीला
५.२५ टीएमसी : मृत पाणीसाठा
३२.५ टीएमसी : सिंचनासाठी
- चौकट
धरणाचा लेखाजोखा
तांत्रिक वर्ष : १ जून ते ३१ मे
साठवण क्षमता : १०५.२५ टीएमसी
सद्य:स्थितीत साठा : ४२.४२ टीएमसी
ओलिताखाली क्षेत्र : १२.२३ हजार हेक्टर
ओलिताखाली येणारी गावे : २००
- चौकट
... अशी झाली उभारणी
प्रशासकीय मान्यता : सन १९५४
कामाला सुरुवात : १९ जानेवारी १९५४
पाणी अडविण्यास सुरुवात : सन १९६१
धरणाचे उद्घाटन : १६ मे १९६२
धरणाचे काम पूर्ण : सन १९६३
- चौकट
प्रारंभीची क्षमता ९८.७८ टीएमसी
कोयना धरणाची उभारणी झाल्यानंतर सुरुवातीची साठवण क्षमता ९८. ७८ टीएमसी होती. २००३ सालापासून साठवण क्षमतेत वाढ होऊन ती १०५.२५ टीएमसी झाली.
फोटो : ३०केआरडी०१
कॅप्शन : कोयना धरण