सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.यावर्षी जिल्ह्यात पावसाला वेळेत सुरुवात झाली, तर पश्चिम भागात सतत पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी कोयना धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा १०४ टीएमसीच्यावर गेला आहे.
सध्या धरणातून १ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढे पावसाचा जोर वाढल्यास धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.दरम्यान, कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता अत्यल्प राहिली असल्याने पाणी सोडताना पूर्व कल्पना देण्यास कालावधी मिळणार नाही. त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीच्या काठावरील सर्व लोकांनी काळजी घ्यावी.
सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करू नये. वीज मोटारी, शेती अवजारे किंवा तत्सम साहित्य व पशुधन यांच्यासह सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन कायेना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.