सातारा : जिथे दिवसाला २००, ३०० मिलिमीटर पाऊस पडतो त्याच पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला यंदा पाऊस कमी आहे. त्यामुळेच कोयना धरणात २४ आॅक्टोबरपर्यंत १२६ टीएमसी पाणी आवक झाली. तर गतवर्षी तब्बल २३६ टीएमसी पाणी आलेले. दरम्यान, कोयना धरण क्षेत्रात शुक्रवारपर्यंत ४५२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याची ओळख दोन भागात होते. पूर्वेकडील दुष्काळी भाग आणि पश्चिमेकडील प्रदेश पावसाचा. पूर्व भागातील शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. या भागात बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा, घेवडा, मका अशी पिके घेतली जातात. तसेच फळबागाही घेण्यात येतात. मात्र, गेल्या काही वर्षात या भागात विविध योजनांचे पाणी येऊ लागलं आहे. त्यामुळे उसासारखी पिकेही घेतली जात आहेत. तर पश्चिम भाग पाण्याने समृध्द समजला जातो.
पावसाळ्यात सतत पाऊस राहतो. त्यामुळे अधिक करून ऊस, सोयाबीन, भुईमुग सारखी पिके घेतली जातात. पण, यावर्षी पश्चिम भागात पाऊसमान लहरी राहिले आहे. काही दिवस दमदार पाऊस पडला. मात्र, बरेच दिवस उघडीपही होती.मागीलवर्षी २७ आॅक्टोबरपर्यंत कोयना धरण क्षेत्रात ७३३५ मिलिमीटर पाऊस झाला होता. तर यावर्षी अवघा ४५१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षीपेक्षा २८२२ मिलिमीटर पाऊस कमी झाला. ज्या ठिकाणी दिवसाला कधी कधी २०० हून अधिक मिलिमीटर पाऊस पडतो. तेथेच सप्टेंबर महिन्यातही कमी पाऊस पडला. यावरून हेच स्पष्ट होते की यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे.
यामुळे कोयना धरणात २४ आॅक्टोबरपर्यंत पाण्याची फक्त १२६ टीएमसी आवक झालेली. गतवर्षी याचवेळी २३६ टीएमसी पाणी आले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत ११० टीएमसी पाणी आवक कमी झाली आहे. त्यातच गतवर्षी धरणातून मोठा विसर्ग करावा लागलेला. यंदा मात्र, खूप कमी पाणी सोडण्यात आले आहे.दरम्यान, यावर्षी आॅक्टोबर महिन्यात अतिवृष्टी झाली. पूर्व भागात हा पाऊस अधिक प्रमाणात झाला. पण, पश्चिमेकडे कमीच होता. तर यावर्षी उशिरा का असेना पश्चिम भागातील सर्वच धरणे भरली आहेत. कोयना धरणात सध्या १०४.७१ टीएमसी ऐवढा साठा आहे. यामुळे पिण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न संपला आहे.नवजाला ३ हजार मिलिमीटर पाऊस कमी...गेल्यावर्षी नवजा येथे २७ आॅक्टोबरपर्यंत ८३९३ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर यंदा आतापर्यंत ५१९७ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तसेच महाबळेश्वरला ५२१७ तर मागीलवर्षी ७३१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावरून यंदा नवजा येथे ३१९६ आणि महाबळेश्वरला २०९७ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे.