सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयना धरणातील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास धरण ओव्हर फ्लो झाले. परिणामी पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृह आणि दरवाजातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यंदा धरण उशिरा भरले आहे.जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण पूर्णपणे अनिश्चित स्वरुपाचे राहिले आहे. जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस दाखल झाला असलातरी त्यानंतर खंड पडला. असे असलेतरी जूनमधील पावसामुळे खरीप हंगाम चांगला आला आहे. सर्वच तालुक्यात पिके चांगल्या स्थितीत आहेत. सध्या पीक काढणी सुरू असतानाच पाऊस सुरू झाला आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या पाऊस होत असलातरी पश्चिमेकडे मात्र तुरळक स्वरुपात पडत आहे. मागील १५ दिवसांत तर कोयना, नवजा, कास, बामणोली, महाबळेश्वरसारख्या भागात अत्यल्प पाऊस पडला आहे. त्यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक कमी होत गेली. तर गेल्या १५ दिवसांचा विचार करता मंगळवारी दिवसभरात पश्चिमेकडे चांगला पाऊस झाला. त्यामुळे कोयना धरणात वेगोन पाणीसाठा वाढला.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४२८५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मंगळवारी दिवसभरात चांगला पाऊस झाल्याने कोयनेतील पाणीपातळी वेगाने वाढली. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास १०५.२५ टीएमसी क्षमतेचे कोयना धरण पूर्ण भरले. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पायथा वीजगृहातून प्रथम विसर्ग सुरू करण्यात आला.
तर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास पायथा वीजगृह १०५० आणि धरणाच्या दोन दरवाजातून ३१८२ असा मिळून ४२३१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे. त्यातच धरणातील आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी-जास्त करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत नवजाला ४६ तर यावर्षी आतापर्यंत ४९५२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंतच्या २४ तासांत २६ आणि जूनपासून ४९०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सातारा शहरासह परिसरात बुधवारी सकाळच्या सुमारास पावसाची रिमझिम सुरू झाली. मात्र, दुपारच्यावेळी ढगाळ वातावरण होते.कोयना, नवजाला ३ हजार मिलिमीटर कमी पाऊस...जिल्ह्यात गेल्यावर्षी जवळपास पाच महिने पाऊस होता. त्यामुळे मागील काही वर्षांतील पावसाचा रेकॉर्ड मोडला गेलेला. त्या तुलनेत यंदा पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला पाऊस कमीच झाला आहे. कोयनेला ३०८५, नवजा येथे ३४४१ आणि महाबळेश्वरला २४०७ मिलिमीटर पाऊस आतापर्यंत कमी झालेला आहे.