सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गुरूवारी सायंकाळच्या सुमारास ७८ टीएमसीवर साठा झालेला. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सर्व सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून ११ हजार क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तरीही धरणातील पाण्याची आवक वाढत असल्याने विसर्गात २० हजार क्यूसेकपर्यंत वाढ होणार आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने दाणादाण उडवून दिली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटलाय. तसेच रस्तेही बंद आहेत. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाच दिवसांपासून संततधार सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत चालला आहे. त्यामुळे तीन दिवसांपूर्वी धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करून १ हजार ५० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला होता.त्यातच सध्या होत असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक ८६ हजार क्यूसेकवर पोहोचली. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरूवारी सायंकाळी पाच वाजता धरणाचे सर्व सहा दरवाजे दीड फुटांनी उचलून ११ हजार क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच रात्रीपर्यंत त्यामध्ये आणखी वाढ करुन २० हजार क्यूसेकपर्यंत नेण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ..पाटण तालुक्यात जोरदार पाऊस होत आहे. यामुळे कोयना नदीतील पाण्याची पातळी वाढली आहे. त्यातच कोयना धरणातूनही विसर्ग सुरू झाला आहे. या कारणाने कोयना नदी दुथडी भरुन वाहू शकते. याचा विचार करुन नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.