सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना आणि नवजा येथे तुरळक स्वरुपात पाऊस झाला. तर महाबळेश्वरला उघडीप होती. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.९६ टीएमसी ऐवढा पाणीसाठा होता. दरम्यान, पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या मध्यावर मुसळधार पाऊस झाला होता. विशेष करुन पश्चिम भागात धुवाँधार पाऊस झालेला. यामुळे पश्चिमेकडील प्रमुख धरणांत पाणीसाठा वेगाने वाढण्यास सुरूवात झाली होती. तर शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. असे असतानाच गेल्या १५ दिवसांपासून पावसाने सध्या दडी मारली आहे. त्यामुळे पश्चिमसह पूर्व भागातील खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. धरणातही पाण्याची आवक कमी होताना दिसून येत आहे. तर कोयना धरणात येणारी पाण्याची आवक पूर्ण थांबलेली आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे अवघा ४ मिलीमीटर पाऊस पडला. तर जूनपासून ९२९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला १३ तर यावर्षी आतापर्यंत ११०४ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. महाबळेश्वरला सकाळपर्यंत काहीच पाऊस झाला नाही. पण, जूनपासून १२८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आतापर्यंत महाबळेश्वरला सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे.सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.९६ टीएमसी ऐवढा पाणीसाठा होता. धरणाच्या पायथा वीजगृहातून होणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. दरम्यान, सातारा शहराबरोबरच परिसरात ढगाळ वातावरणाबरोबर ऊनही पडत आहे. पूर्व भागात खरीप हंगामाची पेरणी अडखळत सुरू आहे. पेरणी पूर्ण होण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
कोयना, नवजाला तुरळक पाऊस, धरणात ४२ टीएमसी साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 5:42 PM
Rain Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना आणि नवजा येथे तुरळक स्वरुपात पाऊस झाला. तर महाबळेश्वरला उघडीप होती. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४१.९६ टीएमसी ऐवढा पाणीसाठा होता. दरम्यान, पूर्व तसेच पश्चिम भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
ठळक मुद्देकोयना, नवजाला तुरळक पाऊस, धरणात ४२ टीएमसी साठा महाबळेश्वरला उघडीप, पावसाची प्रतीक्षा कायम