आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २४ : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणात सोमवारी (दि. २४) सकाळी ११ वाजेपर्यंत ७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ३२.२५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये या धरणात तब्बल ३० टीएमसीने वाढ झाली. सध्या धरणात प्रतिसेंकद ३४ हजार २६४ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील दहा ते पंधरा दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते. सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभर व बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण २८४.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात झाला. याठिकाणी १४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस
सातारा १९, जावळी ६२.४, पाटण ३१.१, कऱ्हाड ५.८, कोरेगाव ६.२, खटाव ६.२, माण ०.३, फलटण शून्य, खंडाळा ०.६, वाई ६.८, महाबळेश्वर १४४.८ मिलीमीटर
आजपर्यंत ६ हजार ३७० मिलीमीटर पाऊस
सातारा जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत ६ हजार ३७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यापैकी निम्मा पाऊस एकट्या महाबळेश्वर तालुक्यात झाला आहे. महाबळेश्वरात आजपर्यंत २८२६.६ मिलीमीटर पाऊस झाला असून अजुनही याठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला असताना पूर्वेकडील फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांंत अद्यापही दमदार पाऊस झाला नाही.