सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला शुक्रवार सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. तर महाबळेश्वरला सर्वाधिक १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
यामुळे कोयनेत पाण्याची आवक वाढली असून सकाळी आठच्या सुमारास धरणात ८२.३९ टीएमसी ऐवढा साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात येणार होता. दरम्यान, सातारा-ठोसेघर मार्गावर दरड कोसळली आहे.शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ११२ तर जूनपासून आतापर्यंत २९९७ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला १७७ आणि आतापर्यंत ३३३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत १२२ आणि आतापर्यंत ३३४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
सकाळच्या सुमारास कोयना धरणात ३७०९४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ८२.३९ टीएमसी इतका झाला होता. २४ तासांत धरणसाठ्यात साडे तीन टीएमसीवर वाढ झाली. त्याचबरोबर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून जवळपास २१०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.दरम्यान, सातारा-ठोसेघर मार्गावर सज्जनगडजवळील बोरणे घाटात पावसामुळे दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड आले होते. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावरील आलेले हे दगड हटविण्याचे काम सुरू होते. तर सज्जनगडजवळ पावसामुळे रस्त्यावर झाडे पडली होती. यामुळेही वाहतुकीस अडथळा आलेला.