फलटण : फलटण शहराच्या मध्यभागी असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकाच्या सुशोभिकरणाचे काम सुरू झाले आहे. हा चौक रुंद, विकसित होण्याबरोबर वाहतुकीच्या कोंडीतून मुक्त होणार आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याचे स्थलांतर केले जाणार असून, हा चौक शहराच्या नावीन्याचा आयडॉल ठरणार आहे.
फलटण शहरातील बसस्थानकाजवळ क्रांतिसिंह नाना पाटील चौक आहे. या चौकातून पुणे, पंढरपूर, दहिवडी आणि फलटण शहराकडे जाता येते. सततच्या रहदारीमुळे या चौकात वाहतुकीची सतत कोंडी होत असते. चौकापासून काही अंतरावर श्रीराम सहकारी साखर कारखाना असून, उसाच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या अधिकच गंभीर बनते. या चौकालगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली होती. त्यामुळे रस्ता अरुंद होऊन अपघातांच्या संख्येत वाढ झाली होती. या चौकातील वाहतूक कोंडीबाबत अनेक वेळा ‘लोकमत’ने तसेच विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवून वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी केली होती. यानंतर मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दबाव न घेता या चौकातील सर्व अतिक्रमणे काढून टाकली.
समस्यांच्या गर्तेत अडकलेला हा चौक आता कात टाकणार आहे. नगरपालिकेमार्फत या चौकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी स्वखर्चाने डेक्कन चौकाचे सुशोभीकरण केले. त्याच धर्तीवर क्रांतिसिंह नाना पाटील चौकाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय फलटण नगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून सुमारे पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
(पॉइंटर करणे)
होणारी कामे..
- पालिकेकडून या चौकातील भुयारी गटार योजनेचे काम सुरू करण्यात आले असून, चौकातील विद्युत खांब काढून अंडरग्राउंड विद्युत वाहिनी करण्यात येणार आहे.
- पूर्वेकडील नीरा उजवा कालव्यावरील जुन्या पुलाशेजारी नवीन पूल उभारला जाणार आहे.
- क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याची मध्यवर्ती जागा बदलून नवीन रस्त्याशेजारी या पुतळ्याचे स्थलांतर करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे.
- तेथे पुतळ्याचे सुशोभीकरण करून सेल्फी पॉइंटही करण्यात येणार आहे.
- पादचाऱ्यांसाठी चारही बाजूने फूटपाथ बनविण्यात येणार आहे.
- क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते पृथ्वी चौकाचे रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
(कोट)
फलटण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकाचे सुशोभीकरण केले जाईल. हा चौक भव्य दिव्य, सुंदर दिसण्या बरोबरच वाहतुकीची कोंडीही कायमची दूर होईल. क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याचे कामही ३१ मार्चअखेर पूर्ण केले जाईल.
- प्रसाद काटकर, मुख्याधिकारी
(कोट)
क्रांतिसिंह नाना पाटील चौकात दिवसरात्र वाहतूक कोंडी होत होती. या चौकाकडे कोणी लक्ष देत नव्हते, मात्र मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी मोठ्या धाडसाने येथील अतिक्रमणे काढल्याने चौक मोठा झाला. चौकाच्या सुशोभीकरणामुळे फलटणच्या सौंदर्यात भर पडणार आहे तसेच वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.
- राजेंद्र गोडसे, रिक्षा व्यावसायिक
फोटो : १२ फलटण
फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. (छाया : नसीर शिकलगार)