कृष्णा कॅनॉलवरून गोवारे येथे जाण्यासाठी रस्ता आहे. या रस्त्यावरून गजानन हौसिंग सोसायटी, चौंडेश्वरीनगर, गोवारे, हनुमाननगर, शहापूर येथील ग्रामस्थांचा दळणवळणासाठी एकमेव रस्ता आहे. मात्र, कॅनॉल ठिकठिकाणी खचल्याने या रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली होती. चारचाकीसाठी तर हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला होता. शिवाय कॅनॉलमध्ये जलपर्णीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. गोवारे, सैदापूर, कोरेगावपर्यंत कॅनॉलची ठिकाणी पडझड झाली होती. पाटबंधारे विभागाने कॅनॉलची डागडुजी केली आहे. पडझड झालेल्या ठिकाणी भराव केला आहे. काही ठिकाणी बांधकाम करण्यात आले आहे. शिवाय पात्रात वाढलेली जलपर्णी काढली आहे. त्यामुळे कृष्णा कॅनॉलचे रूपडे पालटले असून, पाणीही प्रवाहित झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
कृष्णा कालव्याचे उपविभागीय अभियंता सुधीर रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम करण्यात आले. भविष्यात लोकसहभाग घेऊन कॅनॉल स्वच्छ करण्याचे नियोजन आहे.