कराड
आज सर्वच साखर कारखाने बऱ्याच अडचणीतून वाटचाल करीत आहेत. अशा अडचणीच्या परिस्थितीत डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाला संचालक मंडळाची साथ मिळाली. त्यामुळेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या पाच वर्षांत कर्मचाऱ्यांची चारवेळा पगार वाढ केली आहे. साहजिकच कामगारांचा नेतृत्वावर विश्वास दृढ झाला आहे, असे मत कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी व्यक्त केले.
रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात नुकतीच कामगारांना पगारवाढ करण्यात आली. संचालक मंडळाच्या या निर्णयाचा शनिवारी कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारासमोर फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. त्यावेळी कार्यकारी संचालक दळवी बोलत होते.
कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संचालक धोंडिराम जाधव, पांडुरंग होनमाने यांनी कामगारांचे स्वागत केले. यावेळी कामगारांची मोठी उपस्थिती होती. कामगारांनी ऋण व्यक्त करताना डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांचे आभार मानले. यावेळी कामगारांनी सुरेश भोसले यांच्या नावाने घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
फोटो: रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर कामगारांनी पगारवाढीचा आनंद फटाके वाजवून व्यक्त केला.