यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची झाली. सुरुवातीपासूनच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर राजकीय खलबते झाल्याचे दिसून आले. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांची आघाडी होऊन भोसले विरुद्ध मोहिते, असा सामना पाहायला मिळेल अशी अटकळ प्रारंभी बांधली जात होती. मात्र, अखेरपर्यंत ही आघाडी झालीच नाही. डॉ. इंद्रजित मोहिते यांचे ‘रयत’, अविनाश मोहिते यांचे ‘संस्थापक’ आणि डॉ. सुरेश भोसले यांचे ‘सहकार’ अशी तिरंगी लढत कृष्णेच्या रणांगणात झाली. मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यापासून सर्वांच्या निकालाकडे नजरा लागल्या होत्या.
कऱ्हाडातील वखार महामंडळाच्या गोदामात गुरुवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर तिन्ही पॅनेलचे समर्थक मतमोजणीस्थळी दाखल झाले. सकाळच्या पहिल्या टप्यात इतर मागास प्रवर्ग व भटक्या जाती जमाती प्रवर्गातील मतांची पाच हजारांच्यावर आघाडी गेल्याचे समजताच भोसले समर्थकांनी गुलालाची उधळण सुरू केली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टवरही जल्लोष करण्यात आला. तसेच सहकार पॅनेलचे गावोगावचे कार्यकर्ते ट्रस्ट परिसरात जमा झाले. दुपारपासून सुरू झालेला हा जल्लोष उत्तरोत्तर वाढत गेला. गावोगावी गुलालाची उधळणीत करीत सहकार पॅनेलच्या विजयाची घोषणाबाजी करण्यात आली.
- चौकट
झेंड्याच्या गाड्यांचे भिरकिट
सहकार पॅनेलने आघाडी घेतल्याचे समजताच गावोगावचे भोसले समर्थक कार्यकर्ते कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टसह मत मोजणीस्थळी दाखल झाले. गुलालात न्हाऊन निघालेल्या या कार्यकर्त्यांनी आपापल्या वाहनाला सहकार पॅनेलचा झेंडा लावून गुलालाची उधळण सुरू केली. सहकारचा झेंडा असलेली ही वाहने दिवसभर कार्यक्षेत्रात गुलालाची उधळण करीत फिरत होती.
फोटो : ०१केआरडी०३
कॅप्शन : कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत सहकार पॅनेलने आघाडी घेतल्यानंतर भोसले समर्थकांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.