आणखी एक निवडणूक; 'कृष्णा'साठी काँग्रेस नेत्यांची मोर्चेबांधणी, मंत्र्यांनीच घेतलाय पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:11+5:302021-05-26T04:39:11+5:30
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल हा संघर्ष कृष्णाकाठाने अनुभवला आहे. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत माेहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यातही हा संघर्ष आजही पहायला मिळतोय.
कराड :
यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा लांबलेला निवडणूक कार्यक्रम सोमवारी जाहीर झाला. २९ जूनला यासाठी मतदान होणार आहे. मंगळवार (दि. २५) पासून अर्ज दाखल करायला प्रारंभ झाला. तरीही कारखान्याची निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार याचे चित्र मात्र स्पष्ट झालेले नाही. पण याबाबत सभासदांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिलेली दिसते.
वास्तविक कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत वर्षभरापूर्वी संपलेली आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर सहकारी संस्थांप्रमाणेच या विद्यमान संचालक मंडळालाही मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मध्यंतरीच्या काळात माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे समर्थक डॉ. अजित देसाई व सहकारी यांनी न्यायालयात धाव घेतली .‘कृष्णा’ची निवडणूक त्वरित घ्यावी अशी मागणी केली. न्यायालयाने त्याची दखल घेऊन संबंधितांना त्वरित निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्याचाच भाग म्हणून हा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला.
कृष्णा सहकारी साखर कारखान्यात यशवंतराव मोहिते यांचे ‘रयत’ पॅनेल व जयवंतराव भोसले यांचे ‘सहकार’ पॅनेल हा संघर्ष कृष्णाकाठाने अनुभवला आहे. त्यांचे वारसदार डॉ. इंद्रजीत माेहिते, डॉ. सुरेश भोसले यांच्यातही हा संघर्ष आजही पहायला मिळतोय. पण सन २००९ /१० साली अविनाश मोहिते यांनी या संघर्षात उडी घेतली. संस्थापक पॅनेल रिंगणात उतरवले. सत्तांतराचा ‘नारळ’ फोडला. त्यामुळे सध्या कृष्णा कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘रयत, सहकार व संस्थापक’ अशी तीन पॅनेल चर्चेमध्ये आहेत.
सध्या कृष्णा कारखान्यात डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलची सत्ता आहे. अविनाश मोहितेंच्या संस्थापक पॅनेलचे काही सदस्य संचालक मंडळात आहेत. मात्र, डॉ. इंद्रजीत मोहिते गट पूर्णत: बाजूला आहे. डॉ. सुरेश भोसले यांच्या सहकार पॅनेलने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केलेली आहे. तर अविनाश मोहिते यांचे संस्थापक, डाॅ. इंद्रजीत मोहिते यांचे रयत पॅनेल यांच्याही बऱ्याच दिवसापासून जोर-बैठका सुरू आहेत.
डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनेलला या निवडणुकीत थोपविण्यासाठी विरोधी माजी दोन अध्यक्ष मोहितेंनी एकत्रित यावे असा सूर काही जण आळवीत आहेत. त्यामुळेच मोहितेंच्या मनोमनिलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या मनोमिलानासाठी दुस्तूरखुद्द माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राज्याचे सहकारमंत्री विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला आहे. डॉ. इंद्रजीत मोहिते, अविनाश मोहिते यांच्या बरोबरची चर्चा पण किती पुढे सरकली हे समजून येत नाही. त्यामुळे मनोमिलन झाले आहे की..होणार आहे का या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे मिळत नाहीत. त्यामुळेच कृष्णाची निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी याबाबत सभासदांमध्ये उत्सुकता दिसत आहे.
पृथ्वीराज चव्हाणांबरोबर बुधवारी महत्त्वाची बैठक
मंगळवारी येथील शासकीय विश्रामगृहात आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णेच्या निवडणुकीसंदर्भातील प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा केली. त्यानंतर बुधवारी याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक पृथ्वीराज चव्हाण घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते.