कऱ्हाड : सातारा, सांगली जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होईल, अशी शक्यता आहे. ही निवडणूक दुरंगी की तिरंगी होणार, याबाबत सभासदांमध्येच संभ्रमावस्था आहे. चाचपणी, तयारी मात्र नेत्यांनी सुरू केली आहे. निवडणुकीसंदर्भात सोमवारी मुंबईत तब्बल चार तास राजकीय खलबते झाली. त्यातून काय निर्णय बाहेर पडणार हे येणाऱ्या काळात समोर येईलच.
माजी मुख्यमंत्री व राज्य मंत्रिमंडळातील दोन विद्यमान मंत्र्यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. कऱ्हाड दक्षिणमधील तीन माजी आमदारांचे पुत्र, दोन माजी मंत्र्यांचे पुतणे बैठकीला हजर होते. या बैठकीला कारखाना निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावू शकणारे मोजके शिलेदारही उपस्थित होते. त्यामुळे यात नक्की काय चर्चा झाली, याची उत्सुकता तर साऱ्यांनाच आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे सर्वच निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा पॅटर्न पाहायला मिळतोय; कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीतही तोच पॅटर्न पाहायला मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीला विशेष महत्व आहे. कृष्णा कारखान्यात भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले यांच्या पॅनलची सत्ता आहे. डॉ. सुरेश भोसले हे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहेत. गतवर्षीचा संचालक मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे संचालक मंडळास मुदतवाढ मिळाली. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया त्वरित राबवावी म्हणून एका सभासदाने थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही निवडणूक प्रक्रिया त्वरित राबवण्याचे निर्देश दिले. त्यामुळेच की काय, सध्या निवडणूकपूर्व प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळते. त्याचाच भाग म्हणून संस्था सभासद यांचे ठराव जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, भाजपने मध्यंतरीच्या काळात हा बालेकिल्ला तोडण्याचा बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केला. पण, भाजप - सेना युती निवडणुकीनंतर तुटली आणि महाविकास आघाडी उदयाला आली. त्यामुळे सगळीकडेच राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. मात्र, कृष्णा कारखान्याची सत्ता भाजपच्या हातात आहे, याचं शल्य महाविकास आघाडीतील नेत्यांना बोचत आहे. तेच शल्य मुंबईतील बैठकीत अनेकांनी बोलूनही दाखवल्याची चर्चा आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या कृष्णेच्या निवडणुकीत राजकीय घडामोडी काय वळण घेणार, हे पाहावे लागणार आहे .
चौकट :
...असा आहे कृष्णेच्या सत्तांतराचा इतिहास
कारखान्याच्या स्थापनेनंतर जयवंतराव भोसले यांनी प्रदीर्घ काळ कारखान्याचे अध्यक्षपद सांभाळले. मात्र, यशवंतराव मोहिते व जयवंतराव भोसले यांच्यात संघर्ष सुरू झाला, अन १९८९मध्ये कारखान्यात पहिले सत्तांतर झाले आणि मदनराव मोहिते कारखान्याचे अध्यक्ष बनले. १९९९मध्ये डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील पॅनेलने पुन्हा सत्तांतर घडवले, तर २००५मध्ये डॉ. इंद्रजीत मोहिते यांनी सत्तांतर घडवीत अध्यक्षपद मिळवले. २०१० मध्ये अविनाश मोहिते यांनी सत्तांतराचा नारळ फोडला.; पण त्यानंतर लगेचच २०१५ मध्ये पुन्हा डॉ. सुरेश भोसले यांनी सत्तांतर घडवून आणले.
चौकट :
सध्याची परिस्थिती काय ...
कृष्णा कारखान्यात सध्या डॉ. सुरेश भोसले यांच्या पॅनलचे पंधरा संचालक कार्यरत आहेत, तर विरोधी अविनाश मोहिते गटाचे सहा संचालक निवडून आले होते. त्यापैकी एक अपात्र ठरवण्यात आला आहे.