सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत असल्याने महाबळेश्वरातून पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी आणि काेयनानगरपासून चिपळूणला जाणाऱ्या कुंभार्ली घाटात दरड कोसळली. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर सततच्या पावसाने जनजीवनही विस्कळीत झाले असून २४ तासांत महाबळेश्वरला २३१ आणि नवजाला तब्बल ३०७ मिलीमीटर पाऊस झाला. यामुळे कोयना धरण साठ्यात जवळपास चार टीएमसी वाढ झाली आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात मागील तीन आठवड्यांपासून पाऊस पडत आहे. सुरुवातीला चांगला पाऊस पडला. त्यानंतर मात्र, जोर कमी होत गेला. मागील आठवड्यात तर उघडझाप सुरू होती. असे असतानाच शनिवारपासून पावसाचा जोर हळूहळू वाढत गेला. रविवारी आणि सोमवारीही चांगला पाऊस पडला. तर सोमवारपासून पावसात वाढ झाली.कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे परिसरातील ओढे, नाले भरुन वाहत आहेत. तसेच भात खाचरेही भरुन गेली आहेत. त्याचबरोबर जोरदार पावसामुळे धोम, बलकवडी, कोयना, तारळी, कण्हेर, उरमोडीसारख्या प्रमुख धरणांतील पाणीसाठाही वाढत चालला आहे. त्यातच मंगळवारी रात्रीपासून पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.जोरदार पावसामुळे महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. जूनपासून आतापर्यंत तीनवेळा दरड पडण्याची घटना घडली. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच कऱ्हाड-गुहागर मार्गावरील कुंभार्ली घाटातही दरड कोसळली. ही दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू झालेले आहे. पण, दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरातील काडोली ते संगमनगर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.
कोयनेत ३१ टीएमसी पाणीसाठा...जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडत असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत जवळपास चार टीएमसीने वाढ झाली. सकाळच्या सुमारास धरणात ३१.१० टीएमसी साठा झाला होता. तर धरणातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. २४ तासांत कोयनेला १५८ मिलीमीटर पाऊस पडला. त्याचबरोबर आतापर्यंत कोयनेला १३०७, नवजा १९६४ आणि महाबळेश्वरला १८९८ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.