पेट्री : सातारा शहराच्या पश्चिमेस जागतिक वारसास्थळ म्हणून कास पठाराची ओळख आहे. या कास पठारापासून राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील फुलांच्या हंगामात हजारो पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणाऱ्या कुमुदिनी तलावातील पाणी पूर्णपणे आटले असून हा तलाव पूर्णतः कोरडा पडला आहे. या तलावालाच स्थानिक ग्रामस्थ सरवारतळे असे म्हणतात.
कास पठारावरील फुलांच्या हंगामात लाखो पर्यटकांना पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी देणारा कुमुदिनी तलाव पठारावरील वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवत होता. परंतु सद्यस्थितीला हा तलाव पूर्णपणे आटला आहे. कास तलाव वगळता अन्यत्र पाणी पिण्यासाठी पाणवठ्यांची उणीव भासू नये तसेच पाण्याअभावी त्यांच्या जीवितास धोका पोहोचू नये या कारणास्तव कास पठार कार्यकारी समिती व वनविभागाद्वारे यापूवी अंधारी परिसर, धावली परिसर, वांजळवाडी, कुसुंबीमुरा, आटाळी, घाटाईफाटा, कास पठार, एकीव तसेच बामणोली बाजूकडील परिसर, कास तलावाच्या पलीकडील परिसरात यापूर्वी ठेवण्यात आलेल्या साधारण तीस ते चाळीस कृत्रिम पाणवठ्यात नित्यनियमित वेळच्या वेळी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे या पठार परिसरातील वन्य पशुपक्ष्यांची तहान भागण्यास मदत होत आहे.
सद्यस्थितीला उन्हाची तीव्रता भासत असून दिवसभर वातावरणात उष्मा वाढताना दिसत आहे. तसेच आसपासच्या गावात पाण्याचे झरे आटण्याच्या मार्गावर असल्याचे स्थानिकांतून बोलले जात आहे.
चौकट
कुमुदिनी (पान भोपळी) नायफांडिस इंडिका !
महाराष्ट्राच्या पश्चिम भागात काही ठिकाणी छोटी तळी आहेत. तळ्यात पाणी असेल अशा भागात पानभोपळी वनस्पती आढळते. यालाच कुमुदिनी किंवा छोटे कमळ म्हणतात. फुलांच्या हंगामात याचे पान पाण्यावर तरंगते. त्यावर पांढरी केसरयुक्त फुले येतात. याची मुळे पाण्यातून माती भागांपर्यंत अन्न घेण्याकरिता तरंगतात. वेल, तणांमार्फत दुसरे रोप तयार होते. उन्हाळ्यात पाणी आटून गेल्यानंतर मुळ्या व कंद जमिनीत सुकतात. पुन्हा पावसाळा आला की जिवंत होतात.
या वनस्पती कास पठारावरील महाबळेश्वर राजमार्गावर असणाऱ्या तलावात आढळून येतात. म्हणून या तलावाला कुमुदिनी तळे नाव पडले. फुलांच्या हंगामात पांढऱ्या शुभ्र कमळांची पर्वणी तर फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या सुरुवातीस हा तलाव वन्य पशुपक्ष्यांची तहान भागवतो. सद्यस्थितीला हा तलाव पूर्ण आटला आहे.