कऱ्हाड : कुंकू हे सौभाग्याचं लेणं; पण ज्या युवतींवर नशीबच खट्टू झालंय त्यांच्या कपाळी कुंकवाचा टिळा उमटणार कसा? ज्यांना रक्ताच्या नात्यांनीही नाकारलं, त्यांचं कन्यादान करणार तरी कोण? कऱ्हाडच्या आशाकिरण संस्थेने अखेर ही जबाबदारी स्वीकारली़. अनाथ म्हणून वसतिगृहात दाखल झालेल्या ६२ मुलींचं त्यांनी कन्यादान केलं. त्यांना हक्काचं घर आणि मायेची माणसं मिळवून दिली़.
आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या युवतींपैकी बहुतांशजणी निराधार म्हणूनच वसतिगृहाची पायरी चढतात. काहीजणींचे आई-वडील हयात नसतात, तर घरच्या गरिबीमुळे काहींच्या आई-वडिलांनी घरावर तुळशीपत्र ठेवलेलं. या-ना-त्या कारणानं आपल्या माणसांना पोरक्या झालेल्या युवती या वसतिगृहाच्या उंबरठ्यावर येतात व येथेच त्या मायेची ऊब अन् आपुलकी शोधतात. वर्षानुवर्ष वसतिगृहालाच घर समजून त्या याठिकाणी वास्तव्य करतात.
रक्ताच्या नात्यातील कोणीही नसल्याने आपला कधी विवाह होईल, हे या युवतींच्या स्वप्नातही नसते; पण मुलगी उपवर होताच ‘आशाकिरण’चे सदस्य आपली ही जबाबदारी ओळखतात. संबंधित युवतीचा अनुरूप आणि कौटुंबिक स्थिती चांगली असलेल्या युवकाशी विवाह लावून दिला जातो. या विवाह सोहळ्यात आशाकिरणचे सदस्य माहेरच्या नातेवाईकांप्रमाणे सर्व जबाबदारी पार पाडतात. कऱ्हाडला १९५४ साली ही संस्था सुरू झाली. महिला व बालकल्याण विभागामार्फत या संस्थेचे काम चालते. गत काही वर्षात वसतिगृहात दाखल होणाऱ्या निराधार मुलींचा विवाह करून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून, आजअखेर ६२ युवतींचं कन्यादान या संस्थेने केले आहे.
- कोट
माहेरपणही होते संस्थेकडून
वसतिगृहातील मुलीचा विवाह ठरवताना संस्थेतील सर्व सदस्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. अगदी घरच्या मुलीप्रमाणे हा विवाह ठरवला जातो़. नियोजित वराची कौटुंबिक व आर्थिक स्थिती, सामाजिक स्थान याचीही पुरेपूर माहिती संकलित केली जाते. तसेच दोघांचीही रक्त तपासणी केली जाते. विवाहानंतर संबंधित मुलीचे माहेरपणही संस्थेमार्फतच केले जाते.
- चौकट
...असा होतो विवाह सोहळा
१) इच्छुक वर संस्थेत त्याबाबतचा अर्ज सादर करतात.
२) अर्ज दाखल झाल्यानंतर वधू-वराची पसंती पाहिली जाते.
३) आशाकिरणचे सदस्य युवकाचे घर, मालमत्ता पाहतात.
४) परिस्थितीची माहिती मुलीला देऊन तिचा होकार, नकार घेतला जातो.
५) पसंती झाल्यानंतर युवकाच्या कुटुंबाची माहिती घेतली जाते.
६) वधू-वराची माहिती संस्थेमार्फत पुणे आयुक्तालयांकडे सादर होते.
७) आयुक्तालयाच्या मंजुरीनंतर वधू, वराची एचआयव्ही तपासणी होते.
८) योग्य मुहूर्त पाहून विवाह सोहळा पार पाडला जातो.
- कोट
आशाकिरण वसतिगृहात दाखल होणाऱ्या मुली, महिलांची संस्थेमार्फत काळजी घेतली जाते. संस्थेमार्फत आजपर्यंत ६२ निराधार युवतींचे विवाह करण्यात आले आहेत. त्या युवतींना हक्काचे घर मिळाले आहे. सध्याही या युवती माहेर म्हणून संस्थेत येतात. काही दिवस राहून पुन्हा आपल्या सासरी निघून जातात.
- सुजाता शिंदे, प्रभारी अधीक्षक
आशाकिरण वसतिगृह, कऱ्हाड