सातारा : जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण समितीचे सभापती अमित कदम यांनी औंध येथे झालेल्या कार्यक्रमात पक्षाचे नेते अजित पवार यांच्या जवळ नाराजी व्यक्त केली. ढेबेवाडीतील कार्यक्रमावेळीच राजीनामा सादर केला असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी औंधमध्ये करून जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना उघडे पाडले. जिल्हा परिषदेतील नाराजीनाट्यामुळे भलतेच वादळ उठले आहे. पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा देण्याऐवजी थेट बंडाचे निशाण फडकाविले. आ. शशिकांत शिंदे यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत जे राजीनामा देणार नाहीत. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अमित कदम व रवी साळुंखे यांच्या राजीनाम्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. जावळी तालुक्यातील अमित कदम यांनी आ. शिंदे यांच्या विधानावर थेट अजित पवारांकडे तक्रार केली. ढेबेवाडीच्या कार्यक्रमात राजीनामा सादर केला असतानाही जिल्ह्यातील नेत्यांना याची माहिती नसल्याचे आश्चर्यकारक विधान त्यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीअंतर्गत असलेले राजीनामानाट्य भलतेच पुढे आले आहे. आ. शशिकांत शिंदे यांच्यावरच हे प्रकरण शेकवण्याचा प्रयत्न कदम यांनी केला. या प्रकारामुळे राष्ट्रवादीतील सुसंवाद कमी होतोय का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अमित कदम यांनी पक्षाकडे राजीनामा सादर केला असल्याने आता केवळ रवी साळुंखेंच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.खासदार उदयनराजे भोसले यांनी आदेश दिल्याशिवाय राजीनामा न देण्याचे स्पष्टीकरण साळुंखे यांनी याआधीच केले आहे. आता उदयनराजे हे प्रकरण किती दिवस ताणतायत, त्यावरच साळुंखेंचे भविष्य निर्भर राहणार आहे. उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ वाढवून घेण्याची खेळीही उदयनराजे करू शकतात. झेडपीच्या राजीनामा नाट्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
कदमांच्या राजीनाम्याचा गौप्यस्फोट
By admin | Published: January 27, 2016 10:54 PM