नितीन काळेल
सातारा : प्रत्येक गावाचे एक वैशिष्ट्य असते. काळाच्या ओघात घडणाऱ्या घटना किंवा आडनावावरूनही गावाला नाव मिळते. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवाडी. सातारा जिल्ह्याचे पूर्वेचे शेवटचे टोक. तर या गावाची सीमा सांगली जिल्ह्यातील अनेक गावांशी जोडली गेलेली. या ठिकाणी एकेकाळी जंगल, पाण्याची उपलब्धताआणि चराऊ कुरण म्हणून असलेला परिसर नंतर लोकवस्तीमुळे कुरणवाडी झाला.
सातारा जिल्ह्यात अशी अनेक गावे आहेत, ज्यांची नावे वेगळी वाटतात. काही गावांना तर ऐतिहासिक संदर्भ आहे. काही गावांची नावे तर तेथील लोकांच्या आडनावावरून पडलेली आहेत. त्यानंतर ती तशीच रूढ झाली आणि शासकीयस्तरावर नोंदली गेली. अशाचप्रकारे माण तालुक्यातील कुरणवडी म्हणता येईल.
३० वर्षांपूर्वी वरकुटे मलवडी गावाचा भाग असलेली ही वाडी. वरकुट्याचे विभाजन झाले आणि कुरणवाडी स्वंतत्र गाव झाले. ग्रामपंचायत स्थापन झाली. तसेच प्रशासकीय स्तरावर स्वंतत्र गाव नोंदले गेले. या गावाची लोकसंख्या १५०० च्य्या आसपास. येथील लोकांचा व्यवसाय पूर्णपणे शेती. या शेतीबरोबरच जनावरे, शेळी आणि मेंढी पालन. आजही येथील मेंढपाळ वर्षातील पाच-सहा महिने चाऱ्याच्या शोधात जिल्ह्याबाहेर जातात. त्याला काळे रान म्हणतात. सोलापूर, उस्मानाबाद ते लातूरपर्यंत जातात. त्यांच्याबरोबर कुटुंबातील कोणी तरी असते. घोड्याच्या पाठीवर संसार बांधून त्यांची भटकंती सुरू असते. तर गावी मुले शाळेत जातात. घरातील वृध्द हे मुलांकडे तसेच शेतीकडे लक्ष ठेवतात. अलीकडे मेंढपाळचे प्रमाण कमी झाले आहे. मुले शिकून नोकरी करत आहेत. कोणी व्यवसाय करत आहे. अशा या गावाचे नाव गवताळ भाग व चराऊ कुरण यामुळे पडल्याचे ग्रामस्थ सांगतात.
सुमारे १०० वर्षांपूर्वीही कुरणवाडी भागात पाण्याची उपलब्धता होती. लोकवस्ती फारशी नसल्याने गवताळ भाग अधिक होता. दाट झाडीमुळे जंगल होते. त्यामुळे वरकुटे मलवडी परिसरातील लोक तेथे जनावरे चरण्यासाठी घेऊन जायचे. येथील पाणी, जनावरांसाठी गवत पाहून कालांतराने या भागात अनेक लोक स्थलांतरित झाले. येथे आटपाडकर, मिसाळ, बनसोडे, नरळे, खांडेकर अशा आडनावाचे लोक राहतात. यामध्ये बहुतांशी आटपाडकर नावाचे लोक आहेत. यामधील अनेकजण मूळचे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील असल्याचे सांगण्यात आले. दुष्काळामुळे स्थलांतर करत ते आटपाडी (जि. सांगली) येथे आले. त्यानंतर ते कुरण परिसरात आले. त्याचबरोबर त्यांनी येथेच वास्तव्य केले. त्यांचे आटपाडकर हे आडनाव आटपाडीवरून पडल्याचे सांगण्यात आले. दुष्काळातही पाणी उपलब्ध असल्याने कुरण परिसरात हळू-हळू लोकवस्ती वाढली. लोक शेती करू लागले आणि कुरणचे कुरणवाडी झाली.
चौकट :
साताऱ्यापासून ११२ किलोमीटर अंतरावर...
कुरणवाडी हे गाव माण तालुक्यात आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाऱ्या साताऱ्यापासून जवळपास ११२ किलोमीटर अंतरावर आहे. जिल्ह्याचे हे पूर्व टोक म्हटले जाते. कारण, या गावाला लागूनच सांगली जिल्ह्याची सीमा आहे. तर हेच गाव माण तालुक्याच्या मुख्यालयापासून ५० किलोमिटरवर आहे. तालुक्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला हे गाव आहे. सोलापूर जिल्ह्याची सिमाही या गावापासून जवळच आहे. येथील लोकांचा व्यवहार हा अधिक करून सांगली जिल्ह्यातील दिघंची आणि आटपाडीशी अधिक आहे.
.........................................................................