कोरेगाव तालुक्यातील दहिगाव, आसनगाव, शहापूर, रणदुल्लाबाद, पळशी ही गावे पाणीदार करण्यात योगेश यांना यश आलंय. आता तालुक्यातील इतर गावांमध्येही पाणी खेळवून गावे समृध्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. युवक जर सकारात्मक नजरेतून गावांकडे पाहत असतील, तर काय कायापालट होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून ही गावे पुढे आलेली आहेत.
योगेश चव्हाण यांनी दहिगावातून प्राथमिक शिक्षण घेतले. माध्यमिक शिक्षणासाठी त्यांना देऊर येथील मुधाई शिक्षण संस्थेत जावे लागले तर वाघोली येथील विद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुण्यातील नारळीकर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी उच्चशिक्षण घेतले. सध्या ते पुण्यातील अमेरिकन कंपनीमध्ये एचआर मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. कंपनीत कार्यरत असतानाच त्यांना सीएसआर फंड व परदेशातून चांगल्या कामांसाठी मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती मिळाली. जन्मापासून कळता होईपर्यंत आपल्या गावासह तालुक्यात पाहिलेला दुष्काळ या माध्यमातून दूर करता येईल, असा विचार योगेश यांच्या मनात घोळत हाेता.
२०१८मध्ये गावशिवारात माथा ते पायथा त्यांनी कामे हाती घेतली. सासवड येथील ग्रामगौरव संस्थेच्या कल्पना साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन त्यांना मिळाले. सुरुवातीला दहिगाव येथे शिवार पाहणी करण्यात आली. हेच योगेश यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. गाव पाणीदार करत असताना सर्वच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हे धोरण त्यांनी सुरुवातीपासूनच ठेवले आहे. तालुक्यात जमीन भरपूर आहे. पण ती बारमाही हिरवीगार ठेवण्यासाठी काय करावे लागेल, हाच विचार योगेश यांच्या मनात रोज घोळत असतो. त्यांचे काम पाहण्यासाठी कोरेगाव उत्तर भागात फेरफटका मारायलाच हवा. योगेश हे स्वत: शनिवारी पूर्णवेळ या कामासाठी देतात.
विहिरींचे पाणी १५ फुटांवर
उन्हाळ्यात ज्या भागात ३५० फूट खोल पाणीपातळी जात होती, त्याचठिकाणी माथा ते पायथा असे काम करुन पाणी साठविण्यात योगेश चव्हाण यांना यश आले आहे. जुन्या बंधाऱ्यांची गळती काढणे, गाळ काढणे, समतल चर काढणे, अशी कामे झाल्याने आता दहिगावात विहिरींना १५ फुटांवर पाणी आले आहे.
नोकरी शोधण्याची गरजच काय?
एचआर विभागात काम करत असल्याने योगेश यांच्याकडे गावाकडचे अनेक तरुण नोकरीसाठी अर्ज करतात. स्वत:ची जमीन आहे, मात्र पाणी नाही त्यामुळे शेतकऱ्यांची ही मुले पदवी घेऊन पुण्यात नोकरी शोधत फिरतात. गावात पाणी उपलब्ध झाले तर बागायती पिके घेऊन शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध करण्यावरदेखील योगेश यांनी काम सुरु केले असल्याने ४० ते ५० हजार रुपये प्रतिमहिना गावात राहून मिळत असतील तर नोकरी शोधण्याची गरजच काय? असे योगेश यांचे म्हणणे आहे.
(सागर गुजर)
फोटो नेम : १० दहिगाव ०१, ०२