रहिमतपूर : मराठी साहित्याचे भीष्माचार्य म्हणून साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची ओळख साऱ्या मराठी विश्वाला आहे. त्यांनी वैविध्यपूर्ण लेखन करीत मराठी साहित्य विश्वात मोलाची भर टाकत मराठी साहित्य समृद्ध केले, असे प्रतिपादन प्रा. श्रीकांत बोधे यांनी केले.
रहिमतपूर येथील हिंद वाचनालयात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन हा मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष दत्तात्रय वीर होते.
बोधे म्हणाले, ‘मराठी भाषेला सातशे वर्षांची परंपरा लाभलेली आहे. संतांनी मराठी साहित्य ओवी व अभंगाच्या माध्यमातून समृद्ध केले. ही परंपरा मराठी साहित्यिकांनी जपली आहे.’
दत्तात्रय वीर म्हणाले, ‘मराठी ही आपली मातृभाषा, मायबोली आहे. तिचा विकास व संवर्धन करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे.’
प्रारंभी कवी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजी कोरे, साहेबराव चव्हाण, संभाजी माने, अजमल आतार, सुनीता मदने, सर्जेराव कारंडे, कार्यकारिणी विश्वस्त, सभासद, वाचक उपस्थित होते. संजय जंगम यांनी प्रास्तविक केले. उमा सावंत यांनी सूत्रसंचालन केले. विलास शिंदे यांनी आभार मानले.