रहिमतपूर : ‘राज्यात शिक्षकांच्या हजारो जागा रिक्त असताना ‘समायोजन’च्या नावाखाली शिक्षणमंत्र्यानी शिक्षक भरती प्रक्रियेवर बंदी आणली आहे. परिणामी, समाजात बेकारीचे प्रमाण वाढून बेरोजगार तरुणांच्या समस्या वाढत आहेत. १५ महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या या सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली तरुण, शेतकरी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.वाठार किरोली (ता. कोरेगाव) येथे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, कराड पंचायत समितीचे सभापती देवराज पाटील, कोरेगावच्या सभापती रूपाली जाधव, सुनील खत्री, सुभाषराव शिंंदे, लक्ष्मीताई गायकवाड, जितेंद्र पवार, मानसिंंगराव जगदाळे उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘सरकारला राज्यकारभार करता येत नाही. राज्यातील हजारो माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. सहकारी क्षेत्रामध्येही जागा रिक्त आहेत. यासाठी शिक्षकांनी नागपूर अधिवेशनात मोर्चे काढले व उपोषणे केली तरी त्याची दखल घेतली जात नाही.आमचे सरकार असते तर नोकरभरती व दुष्काळासंदर्भात लगेच निर्णय घेऊन हजारो घरे आपल्या पायावर उभी केली असती.’कार्यक्रमास अॅड. नितीन भोसले, सागर पाटील, शाहूराज फाळके, शहाजी क्षीरसागर, अनिवाश माने, चंद्रकांत जाधव, अॅड. अशोक पवार, संभाजी गायकवाड तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी बाळासाहेब सोळसकर यांचे भाषणे झाले. सोमनाथ गायकवाड यांनी प्रास्तविक केले. विकास पवार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
कुठायत ‘अच्छे दिन’? जनतेचा भ्रमनिरास!
By admin | Published: January 11, 2016 10:05 PM