पेट्री : जागतिक वारसास्थळ, जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू असून, दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. भारतासह नेदरलँड, जपान, फ्रान्स येथील विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटून कास पठाराचे कौतुकही केले.
कास पठारावर पर्यटनासाठी राज्यासह देश-विदेशांतून पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत हजारो पर्यटकांनी कास पठाराला भेट दिली. शेकडो वाहनांच्या ताफ्यासह हजारोंच्या संख्येने पर्यटक कासला भेट देत आहेत. कास पठाराने आपल्या दुर्मीळ, विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयातही येथील फुलांनी स्थान पक्के केले आहे. फुलांच्या हंगामामुळे परदेशी पर्यटकदेखील कास पठारावर दाखल होत आहेत. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे बंद होती. कोरोनापूर्वी दोन वर्षांपुर्वी फुले पाहण्यासाठी स्वित्झर्लंड, रशिया, जपान, अमेरिका, इंग्लंड, जर्मनी या देशांतील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला.
पठाराचे सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करून परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी कासच्या सौदर्यांबाबत गौरवोद्गारदेखील काढले. फुलांच्या गावी कास पठारावर निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची कुटुंबीयांसमवेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. कास-महाबळेश्वर राजमार्गावरील तीन किलोमीटर अंतरावरील पांढऱ्या शुभ्र कुमुदिनी फुलांचे पर्यटकांना आकर्षण होऊ लागल्याने अनेकविध दुर्मीळ फुलांचे तुरळक दर्शन पायी चालत मोठ्या संख्येने पर्यटक फुलांची पर्वणी स्वानुभवत आहेत.
कोट
कास पठारावरील वारा, पाऊस, थंडी पाहता परिसर खूपच सुंदर आहे. पुन्हा एकदा भेट देण्याचा मनोदय आहे. आमच्या देशामध्ये कास पठाराची चर्चा होत असते. त्यामुळेच आम्ही आवर्जून या ठिकाणी आलोत.
-मार्टीन डेर्व्हिल,
परदेशी पर्यटक, नेदरलँड
चौकट
कास पठार सहल अतिशय उत्कंठावर्धक होती. मी गुगल विकिपिडियावर माहिती घेतली. मला येथे येण्याची खूप इच्छा होती. येथील वातावरण अतिशय सुंदर असून, जंगली फुले फक्त पावसाळ्यात पाहायला मिळतात. मला पुन्हा- पुन्हा याठिकाणी यावेसे वाटत आहे. पठारावर असलेले सूचनाफलक मराठीसोबत इंग्रजी भाषेतदेखील असावेत, अशी अपेक्षा जापनीज पर्यटकांनी व्यक्त केली.
फोटो
२१कास
कास पठाराला सोमवारी परदेशी पर्यटकांनी भेट देऊन पाहणी केली. (छाया : सागर चव्हाण)