सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. दळणवळण पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि रस्त्यारस्त्यांवर पोलिसांचा फाैजफाटा असल्यामुळे हे प्रकार टळले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात दरवर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतात. जिल्ह्यात महिन्याकाठी १० ते १५ मुलींचे अपहरण होत असते. मात्र हे अपहरण लग्नाच्या आमिषाने सर्वाधिक होत असते. मुलीच्या ओळखीचा मित्र असो की नातेवाईक; तो या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांचे कर्तव्य असते. त्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा पोलिसांना शोध घ्यावाच लागतो. गेल्या दीड वर्षात २८ मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहेत. यांतील २१ मुलींचा शोध लागला आहे.
अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्यानंतर आम्ही प्रथमत: तिच्या नातेवाइकांची माहिती घेतो; पण बऱ्याचदा मुलींचे प्रेमप्रकरण असते. अशा वेळी जो कोणी मुलींना पळवून नेतो, त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या मर्जीनेसुद्धा ती लग्न करू शकत नाही. त्यामध्ये पालक तक्रार देतात.
- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे
पोलिसांना चार टक्के मुलींचा शोध लागेना
अनेकदा मुली घरातून रागाच्या भरात निघून जातात. अशा वेळी पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलीस तत्काळ मुलीला शोधून काढतात. मात्र, हाच प्रकार जर प्रेमप्रकरणाचा असेल तर पोलीस थोडी चालढकल करतात. तिने लग्न केले असेल, असे समजतात.
अपहरण झालेली मुलगी बऱ्याचदा ओळखीच्या मुलाबरोबर निघून जात असते. अशा वेळी जर त्यांचा फोन नंबर पोलिसांना मिळाला नाही, तर मग मुलीचा शोध लागणे अवघड बनते. तरीसुद्धा सध्या चार टक्के मुलींचा शोध पोलिसांना लागेना झाला आहे.
शोधकार्यात अडचणी काय?
प्रेमप्रकरणातून मुलगी घरातून निघून गेल्यानंतर त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनते. मुलगी परराज्यात गेली असल्यास किंवा स्वत:च्या मर्जीने गेली असल्यास ती सापडणे अवघड होते. अशा वेळी अनेकदा मुली मोबाइल वापरणे बंद करतात. त्यांना माहीत असते. पोलीस लोकेशनवरून आपला शोध घेतील. त्यामुळे पोलिसांना मुलींचा शोध घेणे अडचणीचे ठरते. काही मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करूनच घरी येतात. त्यावेळी मग अधिकच गुंता वाढतो.