लोकमत न्यूज नेटवर्क, महाबळेश्वर: ‘राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची खंत व्यक्त करून पश्चिम घाटातील पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी हे समुद्रात वाहून जात आहे. हे पाणी अडवून राज्याच्या पाण्याची गरज पूर्ण करता येईल,’ असे मत केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी महाबळेश्वर येथे बोलताना व्यक्त केले.
मंत्री किरेन रिजिजू हे येथील हवामान खात्याच्या ढग संशोधन केंद्रास भेट देण्यासाठी आले होते. त्यानंतर ते शास्त्रज्ञांच्या बैठकीत बोलताना त्यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला. राज्य सरकारच्या कामाचे वाभाडेच रिजिजू यांनी गुरुवारी बैठकीत काढले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथुराई व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
रिजिजू म्हणाले, ‘महाबळेश्वरप्रमाणेच महाराष्ट्रातील पश्चिम घाट हा निसर्ग संपन्न आहे. एकीकडे पाण्याचे दुर्भिक्ष आहे तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. महाराष्ट्र देशातील एक श्रीमंत राज्य आहे. राज्यकर्त्यांनी मनावर घेतले तर मोठमोठे प्रकल्प बांधून पश्चिम घाटातील पावसाचे पाणी अडवून राज्यातील दुष्काळी भागाकडे वळविता येईल; परंतु राज्य सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे. दोन-चारशे नव्हे तर लाख कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले पाहिजे. मात्र, राज्य सरकार अशा कामांवर पैसा खर्च करीत नाही. पश्चिम घाटातून समुद्रात वाहून जात असलेल्या पाण्याबाबतदेखील रिजिजू यांनी खंत व्यक्त केली.