कराड : कोरोनाच्या महामारी संकटाची दुसरी लाट सध्या थैमान घालत आहे. मुळातच बाधित असणाऱ्या रुग्णांना इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय; अगोदर बेड मिळेना, बेड मिळाले तर कोरोनावर उपयुक्त असणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळेना. प्रशासनाचा हा भंग कारभार बाधितांच्या मुळावर उठल्याचे सध्या दिसत आहे.
सातारा जिल्ह्यात दररोज बाधितांचा आकडा हजारी पार करू लागला आहे. मृत्यूचा दरही वाढला आहे. त्यामुळे जनता हवालदिल झालेली दिसते. चाचण्यांचे प्रमाण वाढले आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. गृह विलगीकरणात राहणे अनेक जण पसंत करीत आहेत. पण, ज्यांचे आजाराचे प्रमाण जास्त आहे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याशिवाय पर्याय उरत नाही.
कोरोनाबाधितांवर गुणकारी ठरणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. सुरुवातीला हे इंजेक्शन मेडिकल दुकानांमध्ये मिळत होते. मात्र, त्यात होणारा काळाबाजार लक्षात घेऊन आता जिथे रुग्ण उपचार घेत आहेत तेथेच इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पण, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होताना दिसत नाही. उपचार घेणाऱ्या रुग्णांना गेल्या आठ दिवसांपासून इंजेक्शन मिळत नसल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
एका रुग्णाला १४ दिवसांत रेमडेसिविरची सहा इंजेक्शन द्यावी लागतात. सध्या रेमडेसिविरची गरज असणारे शेकडो रुग्ण कराडला हाॅस्पिटलच्या बेडवर आहेत. मात्र इंजेक्शन मिळत नसल्याने त्यांचे नातेवाईक बाहेर सलाईनवर आहेत. काय करावे, हा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.
चौकट
कराडातील कोरोना बेडची संख्या
कृष्णा हॉस्पिटल - ४८०
सह्याद्री हॉस्पिटल - ८०
उपजिल्हा रुग्णालय - ५३
कराड हॉस्पिटल - ४५
शारदा क्लिनिक - ४३
बालाजी केअर सेंटर - ३०
श्री हाॅस्पिटल - २८
राजश्री हॉस्पिटल - २३
एकूण बेड - ७८२
कोट
दहा दिवसांपूर्वी आम्ही रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी केली आहे. मात्र आत्तापर्यंत इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे उपचार करताना अडचणी येत आहेत. इंजेक्शन दिल्यानंतर रुग्ण लवकर बरे व्हायला मदत होते. मात्र इंजेक्शनच उपलब्ध नसल्याने अडचणी होत आहेत.
- डॉ. चिन्मय एरम,
शारदा क्लिनिक, कराड
फोटो - संग्रहित रेमडेसिविर इंजेक्शन