जावेद खान ।सातारा : नगरपालिका व महाराष्ट्र शासनाचा झोपडपट्टी सुधार योजनेंतर्गत सदर बझार लक्ष्मीटेकडी येथील सुरू असलेल्या घरकूल योजनेला येथील काही भुरट्या दादांच्या दादागिरी व चोरट्यांमुळे खो बसला आहे. येथे काम करणाºया कामगारांना दमदाटी देत बाधकांम फोडून साहित्यांची झालेल्या चोरीमुळे पालिकेला १५ लाख रुपये संबंधित बाधकाम कंपनीला द्यावे लागले आहे.
झोपटपट्टी सुधार योजनेंतर्गत या ठिकाणी ११ बिल्डिंगमध्ये ३५२ सदनिका बांधण्यात आल्या आहेत. यातील काही सदनिकेचे लकी ड्रॉ पद्धतीने वाटपदेखील झाले असून, पाणी आणि लाईटची कामे रखडली होती; परंतु मागील वर्षभरापासून या सदनिकेतील दारे, खिडक्या, पाईप, चेंबरवरील फरशी या वस्तू बाधकांम फोडून चोरून नेत आहेत. याबाबत तक्रार केली असता त्या कामगाराला मारहाणदेखील केली जात असल्याने आजमितीला जवळपास १५० हून अधिक सदनिकेच्या भिंती फोडून दारे, खिडक्या चोरल्या आहेत.
या ठिकाणी काम करणाºया कामगारांनादेखील वारंवार दमदाटी करत व्यसनासाठी पैसे मागितले जात असल्याने कामगारदेखील येथे काम करण्यास मिळत नसल्याने येथील काम रखडले आहे. तर पाण्याच्या टाकीसाठी खोदलेल्या खड्ड्यातील मुरुमासाठीसुद्धा दमदाटी करत येथील मुरूम काहींनी ट्रॅक्टरमधून पळविला असल्याचे येथील एका कामगाराने घाबरतच ‘लोकमत’ला सांगितले.
येथील स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, रात्री बारानंतर केवळ व्यसनासाठी येथील भिंती फोडून दारे, खिडक्या आदी साहित्य पळविले जाते. त्यांना विरोध केला तर ‘तुमचा काय संबंध?’ असे म्हणत दमदाटी करत असतात. तर काहीजणांनी या ठिकाणी व्यसनाचा अड्डा केला असून, अवैध व्यवसायदेखील या ठिकाणी रात्री सुरू असतात. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड होत असून, यावर आळा घालण्यासाठी रात्री बंदोबस्ताची मागणी केली आहे.दारे, खिडक्या चोरीला..बांधलेल्या सदनिकेतील दारे, खिडक्या चोरीला गेल्याने मागील आठ महिन्यांपासून हे काम बंद केले होते. या साहित्याची भरपाई पालिकेने दिल्यानंतर पुन्हा हे काम सुरू केले असून, कामगारदेखील या भुरट्या दादांच्या दहशतीखाली काम करत असल्याचे एका कामगाराने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.
मागील चार-पाच वर्षांपासून आम्ही पत्र्याच्या शेडमध्ये राहत आहे. घरकूल योजना वेळेत पूर्ण झाली नसल्याने आम्हाला नागरी सुविधा मिळत नाहीत. या पावसात हे शेड कधी पडतील, याचा नेम नाही. तरी आम्हाला आमच्या हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे.- अण्णा कांबळे, घरकूल लाभार्थी