तारळे : आपल्या लाडक्या ‘बावऱ्या’ नावाच्या बैलाचा वाढदिवस पोटच्या पोराप्रमाणे धूमधडाक्यात साजरा करून येथील शेतकरी सूर्यकांत बबन माळी याने आपल्या आगळ्या-वेगळ्या बैल प्रेमाचे दर्शन घडविले आहे. परिसरामधून त्या वाढदिवसाचे कौतुक करण्यात येत आहे.मुक्या प्राण्यांवर प्रेम करण्याची शिकवण आपणाला थोरा-मोठ्यांनी साधूसंतांनी दिली आहे. घरातील पाळीव प्राण्यांवर मांजर, कुत्रा, बैल, म्हैस, शेळी यावर शेतकरी अगदी घरच्या सदस्याप्रमाणे सांभाळ करत असतो. यालाही बगल देत आपले बैलावरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी सूर्यकांत माळी याने चक्क बैलाचा वाढदिवस घालून दाखविला आहे. पोटच्या पोराप्रमाणे फक्त केक कापून वाढदिवस साजरा केला. घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा पै-पाहुणे, नातेवाईक, मित्रमंडळींना निमंत्रित केले. भव्य मंडप, डॉल्बी लावून सुमारे सातशे लोकांची पंगत उठवली. यावेळी फटाक्याची आतषबाजीने उपस्थितांचे डोळे दीपवले. चौकाचौकांमध्ये बावऱ्या बैलाच्या वाढदिवसाचे फलक लावले आहेत. प्रवासी व गावकरी अचंबित होऊन ते बघत आहेत.मित्रमंडळी, पै-पाहुणे यांच्या आग्रहाखातर अनेकवेळा बैलगाड्या पळविण्यासाठी बावऱ्याला नेले होते. अनेक बक्षिसे त्याने पटकाविली आहेत. सुमारे चार लाखांपर्यंतची मागणी त्या बैलाला होऊनसुद्धा बैलाच्या प्रेमापुढे ती कमी ठरली. घरची परिस्थिती बेताची असतानासुद्धा अनेक दिवसांपासून बैलाचा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा अनेक प्रयत्न करून पूर्ण झाल्याचे सांगताना पती-पत्नीच्या डोळ्यांत आनंदाश्रू ओथंबून वाहत होते. (वार्ताहर)गावच्या यात्रेत सुमारे दोन वर्षांपूर्वी खोंड खरेदी केला. आजमितीस त्याचे वय चार वर्षांचे आहे. काबाडकष्ट करून प्रसंगी मुलांकडे दुर्लक्ष झाले तरी जनावरांची कधीच आभाळ केली नाही. पत्नी शुभांगी हिने खंबीर साथ दिल्याने शून्यातून विश्व निर्माण केले आहे. पैशाचा मोहाला बळी न पडता आपल्या जनावरांनाच आपली लक्ष्मी मानून प्रामाणिक प्रयत्न केल्याने आज चांगले दिवस अनुभवायला मिळत आहेत.- सूर्यकांत माळी, शेतकरी
लाडक्या ‘बावऱ्या’चा वाढदिवस धूमधडाक्यात!
By admin | Published: March 02, 2015 9:47 PM