शाहूपुरी : सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा वाद सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होता. झुणका भाकर केंद्राला एसटी अधिकाऱ्यांनी लावलेले सील तोडले गेल्याने संबंधितांवर कारवाई व्हावी, ही मागणी करत एसटी अधिकाऱ्यांनी पोलिस मुख्यालयात धाव घेतली. वादग्रस्त झुणका भाकर केंद्रात महिलांनी कोंडून घेतले होते. सोमवारीही या महिला केंद्राची कडी लावून आत बसल्या होत्या. येथील मध्यवर्ती बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राला न्यायालयाच्या आदेशानंतर लावलेले सील रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तोडल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. काही महिलांनी स्वत:ला आतमध्ये कोंडून घेतले होते. या प्रकारामुळे बसस्थानकात प्रचंड तणाव कायम आहे. बसस्थानकातील झुणका भाकर केंद्राचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. एसटी महामंडळाने न्यायालयात धाव घेऊन या झुणका भाकर केंद्राचा ताबा ९ फेब्रुवारीला घेतला होता. मात्र, ‘आमच्यावर अन्याय झाला आहे,’ असा आरोप करत दलित महिला विकास मंडळाच्या महिलांनी त्याच ठिकाणी बेमुदत आंदोलन सुरू केले होते. सोमवारी या केंद्राच्या बाहेरील बाजूस वडापाव तयार करून तो विकला जात होता. हा प्रकार एसटी महामंडळाच्या वरिष्ठ आगार व्यवस्थापक नीलम गिरीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे धाव घेतली. रविवारी झुणका भाकर केंद्राच्या बाहेर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु सोमवार हा पोलिस बंदोबस्त हटविण्यात आला. तक्रार करूनही गुन्हा दाखल झाला नसल्याचे स्पष्टीकरण आगार व्यवस्थापक नीलम गिरी यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत त्या पोलिस अधीक्षक कार्यालयात तळ ठोकून होत्या. याउलट शहर पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. (प्रतिनिधी)
कोंडून घेतलेल्या महिला २४ तासांनंतरही आत
By admin | Published: March 06, 2017 11:49 PM