देवरूखकरवाडीत राहणाऱ्या ७५ वर्षांच्या राहीबाई मारुती कोंडाळकर यांची मुलगी भीमाबाई सखाराम वाशिवले (वय ५२) या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाशिवले येते राहत होत्या. आईची प्रकृती बरी नसल्यामुळे शुश्रूषेसाठी त्या राहिल्या होत्या. पावसाचा जोर वाढलेला असल्याने, ‘आता काय अडलंय तुझं, कशाला जायची गडबड करतीस’ असं म्हणत त्यांच्या आईने मुक्कामी राहायला सांगितले. आपण घरी येत नसल्याचे कुटुंबीयांना कळविल्यानंतर या मायलेकी घरातच होत्या. पावसाचा जोर वाढला आणि वीज गेली. त्यानंतर थोड्या वेळातच त्यांच्या घरावर दरड कोसळली. माहेरपणासाठी आलेली ही लेक आईसह या ढिगाऱ्याखाली जागेवरच ठार झाली.
‘एनडीआरएफ’चं वाईकरांना भारीच अप्रूप
सांस्कृतिक समृद्धीबरोबर नैसर्गिक श्रीमंती हे वाईकरांचे वैशिष्ट्य आहे. मांढरदेवची दुर्घटना सोडली तर वाईकरांना हादरवून सोडेल असा प्रसंग खचितच घडला असेल. ‘संथ वाहते कृष्णामाई’ म्हणत वर्षानुवर्षे येथे वास्तव्य करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच पाहिली. त्यामुळे देवरूखकरवाडीत होणाऱ्या प्रत्येक घटनेचे अपडेट वाईकरांना होते. बाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी बलकवडी धरणातून जोर आणि जाधववाडीत दाखल होण्यासाठी ‘एनडीआरएफ’ टीमला पाचारण करण्यात आले. सैनिकी वाहनांमधून येणाऱ्या या टीमच्या सदस्यांचे आभार मानायला लोक रस्त्यावर उभे राहिले होते.
मायलेकरांच्या बलिदानाने डोळ्यांत पाझर!
शेजारी व नातेवाइकांना संभाव्य दरड कोसळताना पाहून जोर गावच्या अनिता पांडुरंग सपकाळ यांनी जीवाची तमा न बाळगता गावकऱ्यांना मदत करण्यासाठी धाव घेतली. ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढत असतानाच दगडमातीचा लोंढा त्यांना ओढून घेऊन गेला. आईला वाहत जाताना पाहून त्यांना वाचविण्यासाठी मुलगा सचिन यानेही त्या अवाढव्य अजस्र लोंढ्यात स्वत:ला झोकून दिले. यात दोघांचाही मृत्यू झाला, पण त्याचे मातृप्रेम अजरामर झाले. या दोघांविषयी बोलताना अद्यापही ग्रामस्थांना हुंदका आवरत नाही. मायलेकरांच्या बलिदानाने आम्ही वाचलो, असं सांगताना ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये अजूनही पाझर दिसतो.
कोट :
औषधांचा अजूनही तुटवडा
जोर भाग दुर्गम असल्याने तिथं शासकीय मदत पोहोचायला मर्यादा येत आहेत. सध्या गावातील प्रत्येक जण सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब या आजारांनी त्रस्त आहे. शासकीय यंत्रणा खाण्याची सोय करतेय. तिथं आवश्यक असलेली वैद्यकीय मदत ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.
- मारूती गोळे, जोर
तब्बल दहा किलोमीटरची पायपीट
जोर परिसरात सगळीकडेच पाण्याचं साम्राज्य झालं आहे. या भागातून वाईला जायचं म्हटलं तर जंगल तुडवून तब्बल दहा किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. घरातील आजारी लोकांना मिशन हॉस्पिटलला दाखल केल्याने त्यांच्या शुश्रूषेसाठी हा प्रवास गेले चार दिवस आम्ही करतोय.
- सुनील गोळे, गोळे वस्ती
आम्ही जगलो हेच चुकलं
पुराने आमच्या शेतीसह सगळंच वाहून नेलंय. मृत्यू झालेल्यांना शासन आर्थिक स्वरूपात मदत करतंय, पण या कठीण परिस्थितीत जगणाऱ्यांचाही विचार शासनाने केला पाहिजे. आम्ही जगलो म्हणून आमच्या कुटुंबीयांना मदत मिळू शकली नाही अशीच भावना आमच्या मनात निर्माण झालीये.
- शांताराम जाधव, जोर
आकाशच फाटलं, दुसरं काय
लग्न झाल्यापासून गेली ६० वर्षे मी या गावात राहिले. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हा पाऊस सर्वाधिक भीषण आणि भयावह होता. अक्षरश: आकाश फाटल्यासारखा पाण्याचा लोट चारही दिशांनी वाहत होता. घरात शेजारी बसूनही परस्परांचे आवाज ऐकू येईनात. पावसाचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं.
- गंगूबाई जाधव, जोर
आता सुरुवात कुठून करावी?
शेतात पिकेल त्यावरच आम्ही गुजराण करतो. लेकरं मोठ्या शहरात गेल्यानं आम्ही गावाकडेच असतो. पै पै साठवून जीव मारून संसार उभा केला होता. अवदश्या पावसानं आमचं घरच मातीत गाडलं. चार दिवस झालं पातेलं दिसतं का परात म्हणून त्या मातीच्या ढिगाऱ्यात जाती. पण आमच्या घरची काहीच वस्तू दिसेना. सगळं गाडलं गेलंय. आता संसाराची सुरुवात कुठून करावी हेच समजेना.
- यादव, जोर