उंब्रज : रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाचा निषेध करून अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोलीच वाहिली. एवढेच नव्हे तर रस्त्यात पडलेले खड्डेही स्वखर्चातून व श्रमदानातून मुजविले.
चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावरील उंब्रज ते मसूर या मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.
याबाबत शासन व शासकीय अधिकारी दखल घेत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासन व्यवस्था जागी करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्याचे ठरवले होते. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही फिरू लागल्या होत्या. नियोजनानुसार रविवार, दि. २९ रोजी सकाळी अकरा वाजता उंब्रजसह वडोली, शिवडे, मसूर व किवळ येथील ग्रामस्थ व वाहनधारक उंब्रज-मसूर मार्गावर एकत्र आले.
याठिकाणी ग्रामस्थांनी शासनाचा निषेध व्यक्त केला व अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. यानंतर ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणलेल्या मुरूमाच्या माध्यमातून ठिकठिकाणचे खड्डेही मुजविले. या आंदोलनामुळे उंब्रज-मसूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. उंब्रज येथे इरसाल शिव्या दिल्यानंतर आंदोलक मसूरकडे मार्गस्थ झाले. दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.