सातारा : सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला चार वर्षे पूर्ण झाली. या कालावधित सातारकरांनी विकास कमी अन् पालिकेतील ‘खेचाखेची’चं राजकारणंच अधिक पाहिलं. आगामी निवडणूकही आता दहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सातारकरांच्या नगरसेवकांकडून अपेक्षा वाढू लागल्या आहेत. येत्या काही दिवसात सभापती निवडीचा ‘बंद लखोटा’ खुलणार असला तरी विकासाचा ‘लखोटा’ खुलणार कधी? असा प्रश्न सातारकरांसमोर उभा ठाकला आहे.
सातारा पालिकेची २०१६ मध्ये झालेली निवडणूक लक्षवेधी ठरली. खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मनोमीलन तोडून स्वतंत्र आघाडीवर ही निवडणूक लढविली. यामध्ये खा. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीच्या शिलेदारांनी नगराध्यक्षपदासह ४० पैकी २२ जागा जिंकत पालिकेचा गड काबीज केला, तर शिवेंद्रसिंहराजे यांच्या नगरविकास आघाडीने १२ व भाजपच्या ६ नगरसेवकांनी विजयाची पताका फडकविली.
पालिकेत खा. उदयनराजे यांच्या आघाडीची सत्ता आल्यापासून जवळपास १५ नगरसेवकांना सभापती व उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. प्रत्येकाने आपापल्यापरीने शहर विकासात योगदान देण्याचा प्रयत्न केला. मात्र, चार वर्षांच्या कालावधित विकास कमी अन् आघाडीतील अंतर्गत गटबाजीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली. या गटबाजीत सातारा शहराचा विकास मात्र भरकटत चालला आहे.
सातारा पालिकेला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा लाभल्या. त्यांना काम करताना अनंत अडचणी आल्या. मध्यंतरी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची आवईदेखील उठविण्यात आली. मात्र ठोस विकास कामांवर कधीच कोणी वाच्यता केली नाही. ठेकेदारी, तोडपाणी, हाणामारी, लाचखोरी अशा अनेक घटना पालिकेत घडल्या. प्रशासनाची शिस्त बिघडली. विस्कटलेली ही घडी सावरण्यासाठी आता आघाडीप्रमुखांनाच ठोस पावले उचलावी लागणार आहेत. विद्यमान आरोग्य सभापती वगळता उर्वरित सभापतींना आपल्या कार्यकालात कोणतेही ठोस काम करता आले नाही. त्यामुळे आघाडी प्रमुखांना यंदा गाफील राहून चालणार नाही. आगामी पालिका निवडणूक पाहता, आता गतिशील व कृतिशील नगरसेवकांनाच सभापती पदाची संधी द्यायला हवी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सभापतीपदी निवडीचा सर्वाधिकार खा. उदयनराजे यांचाच असणार आहे. यंदाही अपेक्षेप्रमाणे ‘बंद लखोट्यातून’ ही नावे जाहीर होतील. मात्र, राजेंनी आता विकासाचा ‘लखोटा’ही खोलावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(चौकट)
रेंगाळलेली कामे मार्गी लावण्याचे आव्हान
गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून पालिकेच्या विकासकामांची गाडी अत्यंत संथगतीने सुरू आहे. कोरोनामुळे कोणतेही ठोस काम ना प्रशासनाला करता आले ना नगरसेवकांना. कास धरण, भुयारी गटार योजना, अंतर्गत रस्ते, घरकुल योजना, बंदिस्त नाले, स्वच्छतागृह, पाणीपुरवठा योजना यांसह अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामे ठप्प आहेत. विकास कामांच्या या गाडीला आता गती देण्याची वेळ आली आहे.
(चौकट)
गतिशील अन् कृतिशील चेहऱ्यांना संधी द्यावी..
सातारा पालिकेतील विद्यमान आरोग्य सभापतींना वगळता इतर सभापतींना ठोस कोणतेही काम करता आले नाही. ही चूक यंदा करून चालणार नाही. सभापती निवडी करताना आघाडीप्रमुखांना आगामी निवडणुकीचा विचारही करावा लागणार आहे. यासाठी गतिशील आणि कृतिशील सभापतींचीच निवड करायला हवी. जेणेकरून सातारा विकास आघाडीच्या विकास कामांचा रोडमॅप तयार होऊ शकेल.
फोटो : सातारा पालिका