वाई (जि. सातारा) : भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या मांढरदेव येथील श्री काळूबाईच्या दर्शनाला शुक्रवारी लाखो भाविकांनी हजेरी लावली. गेली दोन वर्षे कोरोना निर्बंधामुळे काळूबाई यात्रा न झाल्याने भाविकांना देवीचे दर्शन घेता आले नव्हते; मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने काळूबाईच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली व ‘काळूबाईच्या नावाने चांगभल..’च्या गजरात भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.शुक्रवारी (दि. ६) शाकंभरी पौर्णिमा यात्रेचा मुख्य दिवस असल्याने सकाळी सहा वाजता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा मुख्य प्रशासक देवस्थान ट्रस्ट मांढरदेव मंगला धोटे यांच्या हस्ते देवीची आरती व महापूजा झाली. यावेळी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन एस. जी. नंदीमठ, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, विश्वस्त ॲड. माणिक माने, सीए अतुल दोशी, ॲड. पद्माकर पवार, चंद्रकांत मांढरे, विजय मांढरे, सुनील मांढरे, सुधाकर शिरसागर, ओमकार शिरसागर, आपत्ती व्यवस्थापनचे देवीदास ताम्हाणे, विविध विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.शुक्रवारी शाकंभरी पौर्णिमा असल्याने गुरुवारी रात्रीपासूनच भाविक मांढरदेव येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. भाविक एस.टी. बस, ट्रक, टेम्पो, जीप, कार, दुचाकी, इतर खासगी वाहनांनी मांढरदेव येथे दाखल झाले. गुरुवारी रात्री देवीची मानाची पालखी वाजत-गाजत काळूबाई मंदिरामध्ये आणण्यात आली. त्यानंतर देवीचा जागर झाला. भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.शुक्रवारी सकाळी मांढरदेव येथे धुके व थंडी असल्याने सकाळी गर्दीचा ओघ मध्यम होता; मात्र बारानंतर भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली. दुपारी एकनंतर गर्दीचा ओघ वाढला. त्यामुळे मंदिर परिसरात काही काळ गर्दी होती. दर्शन घेऊन परतणारा भाविक उतरणीच्या मार्गावर थाटलेल्या दुकानात देवीचे फोटो, बांगड्या, प्रसाद, पेढे, मुखवटे व इतर वेगवेगळ्या वस्तू घेत होता. मांढरदेव परिसरात अनेक भाविक वाहने लावून देवीसाठी गोडा नैवेद्य करताना दिसून येत होते.मोठा फौजफाटा...यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मोठा फौजफाटा मांढरदेव येथे तैनात होता. यात्रेसाठी १ पोलिस उपाधीक्षक, २ पोलिस निरीक्षक, १२ उपनिरीक्षक, २०० पोलिस कर्मचारी, २५ महिला कर्मचारी, ६० होमगार्ड, वाहतूक शाखेचे २० कर्मचारी, मांढरदेव येथे तैनात होते. अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंटचे २४० स्वयंसेवक भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्र कमांडो फोर्सचे ७० कर्मचारी मांढरदेव येथे तैनात होते.
‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ च्या गजराने दुमदुमला मांढरगड!, देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 5:13 PM