सातारा : येथील निवासस्थानी उपराकार लक्ष्मण माने यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक येऊन माने साहेब आमचे काय चुकले का ? आम्हाला माफ करा, तुमचे दर्शन द्या, असे म्हणत घराबाहेरच गांधीगिरीप्रमाणे म्हणणे मांडण्यास सुरुवात केली.
त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी माने यांनी दिलगिरीची प्रेसनोट दिल्यानंतर पोलिसांनी समन्वयकांची समजूत काढली. त्यानंतर समन्वयक निघून गेले.येथील निवासस्थानी लक्ष्मण माने यांनी त्यांच्याविरुद्ध सध्या सुरू असलेल्या आरोपांबाबत पत्रकार परिषद घेतली होती. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आले.
निवासस्थानाबाहेरूनच त्यांनी माने साहेब आम्हाला माफ करा, तुम्ही खूप मोठे आहात. आम्ही पाटील असल्यामुळे तुमची खूप भीती वाटते. आमचं काय चुकलं का? तुम्ही आम्हाला लांबून तरी दर्शन द्या, तुमची आम्हाला माफी मागायची आहे, असे गांधीगिरी आंदोलनाप्रमाणे आपले म्हणणे मांडण्यास सुरुवात केली.
त्यावेळी तेथे उपस्थित असणारे पोलीस त्वरित निवासस्थानाबाहेर आले. तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हेही लवकरच घटनास्थळी पोहोचले.समन्वयकांनी पोलिसांना आम्हाला माने साहेबांची माफी मागायची आहे, त्यांना बाहेर बोलवा, आम्ही जातो, असे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी माने यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा पोलीस निरीक्षक धुमाळ यांनी बाहेर येऊन समन्वयकांशी चर्चा केली. त्यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला; पण समन्वयक ऐकून घेत नव्हते.
शरद पवार यांचे नाव घेऊन राजकारण केले, पवार यांचे काय चुकले का? आता आम्हाला माने साहेब यांची माफी मागायचीच आहे म्हणूनच आम्ही येथे आलो आहे. लाखोने आमचे मोर्चे निघाले, कोठेही चुकीचा प्रकार झाला नाही. आम्ही शांततेने त्यांची माफी मागतो, असे सांगितले. त्यावेळी माने यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्याबद्दलची प्रेसनोट देण्यात आली व ती समन्वयकांना देण्यात आली.
पोलिसांनी मध्यस्थीची भूमिका घेत समन्वयकांची समजूत काढली. त्यानंतर सर्वजण गेले. या मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांत बापू क्षीरसागर, संदीप पोळ, शरद जाधव, संदीप नवघणे, शिवाजीराव काटकर, साईराज कदम, तेजस कदम, आकाश साबळे यांचा समावेश होता.